वंचित घटकातील मुलांचा बहारदार नृत्याविष्कार
युवक-युवतींनी राष्ट्रनिर्माणासाठी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक -अॅड. सुभाष काकडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकातील मुलांना शिक्षण देण्यासाठी सुरु झालेल्या फ्लाय फाऊंडेशनच्या वतीने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन देशभक्तीच्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा झाला. विद्यार्थ्यांनी देशभक्ती जागविणारे गीतांवर नृत्याविष्कार सादर करुन भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. तर नाटिकेच्या माध्यमातून सामाजिक संदेश देऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शिल्पा गार्डन येथे झालेल्या या सांस्कृतिक सोहळ्याचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी फ्लाय फाऊंडेशनच्या गौरी मुथा, राधा मुथा, मंजुश्री मुथा, अॅड. सतीश बिहानी, अॅड. सुभाष काकडे, अॅड. किशोर देशपांडे, अॅड. प्रमोद मेहेर, अॅड. किशोर देशपांडे, अॅड. प्रमोद मेहेर, अॅड. नरेश गुगळे, अॅड. विश्वासराव आठरे, अॅड. अशोक गांधी, अॅड. उमेश नगरकर, अॅड. अतुल गुगळे, अॅड. आनंद फिरोदिया, अॅड. स्वप्निल बिहाणी, अॅड. अनिल सुरपुरिया प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अॅड. सुभाष काकडे यांनी युवक-युवतींनी राष्ट्रनिर्माणासाठी उभे केलेले सामाजिक कार्य दिशादर्शक आहे. वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले. अॅड. विश्वासराव आठरे यांनी युवकांची सामाजिक जाणीव कौतुकास्पद असल्याचे स्पष्ट केले. अॅड. किशोर देशपांडे यांनी फ्लाय संस्था वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या पंखात बळ निर्माण करण्याचे कार्य करत आहे. या उपक्रमातून सशक्त भारताचे उत्तम नागरिक घडणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात गौरी मुथा यांनी फ्लाय फाऊंडेशन विद्यार्थ्यांना गणित, विज्ञान व इंग्रजीचे धडे देत असून, त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. टाळेबंदीत गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी फ्लाय फाऊंडेशनची मुहुर्तमेढ रोवण्यात आल्याचे सांगितले.
कोरोना काळात आर्थिक दुर्बल घटक असलेल्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन नसल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षण घेणे अवघड झाले होते. अशा परिस्थितीमध्ये शहरातील बांधकाम व्यावसायिक स्व. शरद मुथा यांची नात गौरी व राधा मुथा यांनी पुढाकार घेऊन आजोबा स्व. मुथा यांच्या प्रेरणेतून व आई मंजुश्री मुथा यांच्या सहकार्याने दुर्बल घटकातील मुलांसाठी शाळा सुरु केली. पाच विद्यार्थ्यांपासून सुरु झालेल्या या शाळेत आज शंभरपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेसाठी मुथा बहिणींना त्यांचे वर्गमित्र सिध्दी झिने, दिया पोपटानी, आचल मुनोत, साहिल गांधी, आदित्य कोतकर, अंकुश ठोकळ, स्वयंम शेटीया, राज मुथा, दिव्यश्री मुनोत, सिया बोथरा, युगा मुथा, आयुष मुथा, सुजल गांधी, युगा भालसिंग यांचे सहकार्य लाभत आहे.