• Mon. Jun 29th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत रंगले उपांत्यपूर्व फेरीचे प्रेक्षणीय सामने

ByMirror

Aug 3, 2023

तक्षीला, सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट, आर्मी पब्लिक स्कूल, श्री साई, ओएसिस व आठरे पाटील स्कूलचे उपांत्य फेरीत प्रवेश

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्सच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी (दि.3 ऑगस्ट) उपांत्यपूर्व फेरीचे सामने खेळविण्यात आले. विविध शालेय संघांच्या खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाच्या प्रदर्शनाने फुटबॉल स्पर्धेचा थरार रंगला होता.


या स्पर्धेतील या पुढील सर्व सामने नॉक आउट पध्दतीचे असल्याने विजयी संघ पुढच्या फेरीत, तर पराभव झालेल्या संघाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागणार आहे. गुरुवारी झालेल्या फुटबॉलच्या सामन्यात तक्षीला, सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट, आर्मी पब्लिक स्कूल, श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल, ओएसिस व आठरे पाटील स्कूलने विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.


सकाळच्या सत्रात 14 वर्ष वयोगटात ज्ञानसंपदा स्कूल विरुध्द सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट मध्ये झालेल्या फुटबॉल सामन्यात 1-0 गोलने सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट संघ विजयी झाला. 16 वर्ष वयोगटात ज्ञानसंपदा स्कूल विरुध्द तक्षीला यांच्यातील सामन्यामध्ये तक्षीलाने 6-0 गोलने एकहाती विजय मिळवला. तर आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट मधील फुटबॉल सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने 5-0 गोलने विजय संपादन केले.


दुपारच्या सत्रात 16 वर्ष वयोगटात श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द आयकॉन पब्लिक स्कूलच्या फुटबॉल सामन्यात 2-0 गोलने श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूलचा संघ विजयी ठरला. 14 वर्ष वयोगटात ओएसिस इंग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द आयकॉन पब्लिक स्कूल मधील फुटबॉलचा सामना शेवट पर्यंत रंगतदार राहिला. दोन्ही संघांनी आक्रमक खेळी करुन एममेकांवर 3-3 गोल केले होते. हा सामना बरोबरीत राहिल्याने पेनल्टीवर घेण्यात आला. यामध्ये पेनल्टीवर ओएसिस स्कूलचा संघ विजयी झाला. तर 16 वर्ष वयोगटात ओएसिस इंग्लिश मिडीयम स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूलच्या फुटबॉल सामन्यात 2-0 गोलने आठरे पाटील स्कूल विजयी झाले. लवकरच उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.


स्पर्धेचे पंच म्हणून अभिषेक सोनवणे, सुयोग महागडे, अभय साळवे, प्रभू कुमार, राजेश चव्हाण, सुशील लोट काम पाहत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवाजीयन्स अकॅडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, पल्लवी सैंदाणे, व्हिक्टर जोसेफ, जेव्हीअर स्वामी आदी परिश्रम घेत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *