• Mon. Jan 27th, 2025

पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती

ByMirror

Mar 28, 2022

नगर तालुक्यात शंभरपेक्षा जास्त कृत्रिम पाणवठे तयार करून पशु-पक्षी व प्राण्यांची भागवणार तहान

अहमदनगर (प्रतिनिधी)- उन्हाळ्यात पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी नगर तालुक्यातील आसपासच्या डोंगरमाथ्यावर कृत्रिम पाणवठे तयार करण्याच्या उपक्रमाचे प्रारंभ रविवारी (27 मार्च) करण्यात आले. टाटा व्हालिंटरींग 17 सप्ताहातंर्गत हा उपक्रम राबविण्यात येत असून, टाटा पॉवरचे कर्मचारी, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र व संवेदनशील युवक मित्र परिवारातील सदस्यांनी नगर-पुणे महामार्गाला खेटून असलेल्या विस्तीर्ण डोंगर पठारावर पाच पाणवठे तयार करुन या अभियानाची सुरुवात केली. नगर तालुक्यातील पठार व डोंगररांगा परिसरात शंभरपेक्षा जास्त कृत्रिम पाणवठे तयार करून पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविली जाणार आहे.


रखरखत्या उन्हामुळे अनेक पाणीसाठे आठत चालले आहे. यामुळे पशु-पक्षी व प्राणी पाणीसाठी भटकंती करताना दिसत आहे. नगर तालुक्यातील पठार व डोंगररांगाच्या परिसरात हरीण, काळवीट, ससे, भेकर आदी प्राण्यांचा अधिवास आहे. हे प्राणी पाण्याच्या शोधात महामार्गावर रात्री-अपरात्री येत असतात, त्यामुळे वाहनाला धडकुन अनेकदा त्यांचा मृत्यू होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून टाटा पॉवरचे विश्‍वास सोनवले, प्रवीण शेंडकर, बॉस्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फादर जॉर्ज दब्रिओ यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच या अभियानात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांनी पशु-पशी व प्राण्यांचे मुखवटे घालून या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी बालाजी चव्हाण, अर्जुन शरणागते, टाटा फियाटचे वावरे व बॉस्को ग्रामीण विकास केंद्रातील प्रशिणार्थी युवक व नागरिक उपस्थित होते. टाटा पॉवर कम्युनिटी डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने पशु-पक्षी व प्राण्यांची तहान भागविण्यासाठी कृत्रिम पाणवठे तयार करण्याचा उपक्रम अहमदनगर, सोलापूर, सातारा व सांगली येथील सौर व पवन उर्जा प्रकल्प क्षेत्रातील गावांत राबविणार असल्याची माहिती विश्‍वास सोनवले यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *