नगर जिल्ह्यातील दिव्यांगांच्या विकासासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करावी
प्रहार दिव्यांग संघटनेची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग वित्त विकास महामंडळाचे नूतन जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी पदभार स्विकारला असता प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने त्यांचे स्वागत करुन सत्कार करण्यात आला. तर जिल्ह्यातील दिव्यांगांचे प्रश्न त्यांच्यापुढे मांडण्यात आले. यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष अॅड. लक्ष्मण पोकळे, जिल्हा सचिव हमिद शेख, सहसचिव किशोर सूर्यवंशी, पोपट शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जिल्हा व्यवस्थापक संतोष शिंदे यांनी जिल्ह्यातील दिव्यांगांच्या स्वयंरोजगारासाठी दिव्यांग स्वावलंबन कर्ज योजना, वैयक्तिक थेट कर्ज योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दिव्यांग बचत गटांना कर्ज देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे व दिव्यांगांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागाने दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे भागभांडवल 25 कोटी वरून थेट 500 कोटी रुपये केल्याबद्दल प्रहारच्या वतीने अॅड. पोकळे यांनी शासनाचे अभिनंदन केले.
अहमदनगर जिल्ह्याचा विस्तार मोठा असून, दिव्यांगांची संख्याही मोठी आहे. दिव्यांगाच्या विकासासाठी महामंडळाने नगर जिल्ह्यासाठी 200 कोटी रुपयांची तरतूद करून ती रक्कम वितरीत करण्याची मागणी यावेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली.