• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

दिव्यांग प्रतिबंधात्मक पालक मेळाव्यात मुलांचे अपंगत्व टाळण्याची जागृती

ByMirror

Dec 10, 2022

दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण

बालकांना दिव्यांगत्वापासून वाचविण्यासाठी पालकांनी जागरुक व्हावे -डॉ. अनिरुद्ध गीते

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात जिल्हा समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद, मतिमंद मुलांची शाळा आणि ज्योत्स्ना उद्योग केंद्र सोसायटी कार्यशाळा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग प्रतिबंधात्मक पालक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याच्या माध्यमातून भविष्यात होणार्‍या आपत्यांना दिव्यांगत्व (अपंगत्व) टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या मेळाव्यास दिव्यांगांचे पालक व त्यांच्या कुटुंबीयांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले.


टिळक रोड येथील मतिमंद मुलांच्या शाळेत झालेल्या दिव्यांग प्रतिबंधात्मक पालक मेळाव्याचे उद्घाटन बालरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध गीते यांच्या हस्ते झाले. संस्थेचे मानद सचिव पी.डी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेच्या सदस्या पुष्पा श्रोत्री उपस्थित होत्या.


बालरोग तज्ञ डॉ. अनिरुद्ध गीते म्हणाले की, दिव्यांग बांधव समाजातील एक घटक असला तरी, बालकांना दिव्यांगत्वापासून वाचविण्यासाठी पालकांनी जागरुक होण्याची गरज आहे. दिव्यांग अनेक कारणांनी निर्माण होत असते. वेळीच लक्ष दिल्यास दिव्यांगत्व टाळता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर दिव्यांगत्वाचे प्रकार, व्यक्तीचा कौटुंबिक इतिहास, रंगसूत्रे, नात्यातील लग्न, आई-वडिलांचे वय, जन्मपूर्व अवस्थेतील वैद्यकीय उपचार, अपुर्‍या सोयी सुविधा तसेच अपंगत्व येण्याची जन्मावेळची व जन्मानंतरची कारणे त्यांनी सांगितली. त्याचबरोबर अपंगत्व टाळण्यासाठी उपाययोजनांची माहिती दिली. तसेच उपस्थित पालकांच्या विविध प्रश्‍नांना उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले.


प्रास्ताविकात भाऊसाहेब कदम यांनी या कार्यशाळेचे महत्त्व व उद्देश स्पष्ट केला. जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने शाळा आणि कार्यशाळेतील विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चित्रकला व विविध मैदानी खेळच्या स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसं देण्यात आली.


शाळेच्या कलाशिक्षिका शोभा होशिंग यांनी 21 प्रकारच्या दिव्यांगत्वाची माहिती दिली. कार्यशाळेचे निर्देशक सुशीला जाधव यांनी दिव्यांगांसाठी दया, सहानुभूती नको, तर त्यांना सन्मानपूर्वक जगण्यासाठी साथ देण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या मानसोपचार तज्ञ माधवी कुटे यांनी केले. आभार शाळेचे मुख्याध्यापक योगेश आल्हाट यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *