बुथ हॉस्पिटलचे देवदान कळकुंबे व फिनिक्स फाऊंडेशनचे जालिंदर बोरुडे यांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी अजीजभाई सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने कोरोना काळात निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देणार्यांचा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कोरोना महामारीत सर्वसामान्यांसाठी नवसंजीवनी ठरलेल्या द साल्वेशन आर्मी संचलित इव्हॅन्जलिन बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे व फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून गरजू घटकांसाठी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेणारे जालिंदर बोरुडे यांचा पोलिस महानिरीक्षक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांनी या उपक्रमाचे आणि सन्मान मिळालेल्या व्यक्तींच्या कामाचे कौतूक केले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे नाशिक विभागीय सचिव मन्सूर शेख, आफताब शेख, अकलाख शेख, जुनेद शेख, ओमकार लिपाणे, नवेद शेख, रमीज शेख आदी उपस्थित होते.

पहिल्या लाटेत काही साधन व मनुष्यबळ नसताना देखील बुथ हॉस्पिटलने इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनाशी लढा दिला. यामुळे अनेकांचे जीव वाचले. कोरोनाची भिती असताना त्यांनी रुग्णांमध्ये एक विश्वास निर्माण केला. चांगली सेवा देऊन रुग्णांमधील भीती दूर केली. यामुळे अनेक रुग्ण बरे होऊन घरी परतले. बुथ हॉस्पिटलने कोरोना रुग्णांना जगण्याची उमेद देऊन, कोरोनाशी लढण्याचे सामर्थ्य व बळ निर्माण केले. तर शासनाची तसेच कोणत्याही संस्थेकडून आर्थिक मदत न घेता गेल्या तीस वर्षापासून फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून जालिंदर बोरुडे कार्य करीत आहे. त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक मोफत शिबिरे आयोजित करून सर्वसामान्य गरजू रुग्णांच्या मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणल्या आहेत. आज पर्यंत त्यांनी 2 लाख 84 हजार 752 गरजूंवर मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया घडवून आनल्या. नेत्रदान चळवळीत भरीव कार्य करून 1 हजार 290 नेत्रहिनांना मरणोत्तर नेत्रदानातून नवदृष्टी दिली आहे. या कार्याबद्दल मेजर कळकुंबे व बोरुडे यांचा सन्मान करण्यात आला.
