माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू अंजू तुरंबेकर करणार खेळाडूंना मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील नवोदित खेळाडूंना फुटबॉल खेळाचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यासाठी माजी राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू आणि एएफसी ए परवानाधारक प्रशिक्षिका अंजू तुरंबेकर यांच्या अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले आहेत. या प्रशिक्षण वर्गाला खेळाडूंचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नुकतेच एप्रिल मध्ये अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबिराचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून नियमित ही अकॅडमी शहरात सुरू करण्यात आली आहे. त्याच्या माध्यमातून प्रशिक्षण वर्ग सुरू झाले आहे. सध्या अकॅडमी गडहिंग्लज, कोल्हापूर भागामध्ये कार्यरत असून, महाराष्ट्र राज्यामध्ये विविध ठिकाणी अजून शाखा कार्यान्वीत होत आहेत.

अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर म्हणाल्या, मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी आणि फुटबॉल विकसित करण्यासाठी त्यांना योग्य वयात योग्य मार्गदर्शन मिळणे खूप गरजेचे आहे. अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी ग्रासरूट व युथ फुटबॉल डेव्हलपमेंटवर लक्ष केंद्रित करून फुटबॉल या खेळाचे आधुनिक आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण देत आहे. त्याचप्रमाणे स्थानिक प्रशिक्षकांना देखील मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्वतः या अकॅडमीस मार्गदर्शन करुन अकॅडमीद्वारे खेळाडूंना सतत खेळाच्या संधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
अहमदनगर फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी अंजू तुरंबेकर या समाजासाठी व तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून, त्यांनी अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या शाखेचे स्वागत केले व तुरंबेकर यांच्या कार्याचे कौतुक केले. शहरात पल्लवी सैंदाने या फाऊंडेशन आणि अकॅडमीचा कार्यभार सांभाळणार आहेत. स्थानिक प्रशिक्षक अभिषेक सोनवणे आणि अक्षय बोरुडे हे प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहेत.
अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून 6 ते खुला गट मुली व 6 ते 17 वयोगटातील मुलांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रोफेसर चौक येथील गंगा उद्यानच्या मागे, मिस्किन मळा व केडगाव येथील रंगोली हॉटेलच्या मागे अशा दोन प्रशिक्षण वर्ग खेळाडूंसाठी चालणार आहे. या प्रशिक्षण वर्गाचा खेळाडूंना लाभ घेण्याचे आवाहन तुरंबेकर यांनी केले आहे. प्रशिक्षण वर्गाच्या अधिक माहितीसाठी पल्लवी सैंदाने यांना 8796858947 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.