जय बाबाचा गजर करीत भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
बाबांच्या सहवासात सेवा केलेल्या ज्येष्ठांची उपस्थिती
अहमदनगर (प्रतिनिधी)- देश-विदेशातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले मेहेरबाबा यांनी अरणगाव (ता. नगर) परिसरात 4 मे 1923 रोजी प्रवेश केल्याच्या घटनेला शंभर वर्षपूर्ण होत असताना, या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दी वर्षानिमित्त गुरुवारी (दि.4 मे) अरणगावातून जय बाबाचा गजर करीत शोभायात्रा काढण्यात आली. आयटक संलग्न लाल बावटा जनरल कामगार युनियन व बिगर युनियन कामगारांच्या पुढाकाराने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मेहेरबाबा ट्रस्टच्या विश्वस्तांसह, ट्रस्टचे सर्व कामगार, भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मेहरबाद येथील बाबांच्या धुनी जवळ असलेल्या लिंबाच्या झाडाखाली पहिल्यांदा मेहेरबाबांचे आगमन झाले होते. त्या ठिकाणी मेहेरबाबांच्या स्मृतीस अभिवादन करुन या शोभायात्रेला प्रारंभ करण्यात आले. या शोभायात्रेसाठी बाबांच्या सहवासात सेवा केलेल्या ताराबाई जवळकर या ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या. गावातील प्रमुख मार्गावरुन शोभायात्रेचे मार्गक्रमण झाले. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या शोभायात्रेमध्ये भक्ती गीतांवर भाविकांनी ठेका धरला होता. सजवलेल्या बैलगाडीत मेहेरबाबांची प्रतिमा दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. फटाक्यांच्या आतषबाजीत निघालेल्या शोभायात्रेने गावात एक भक्तीमय उत्साह संचारला होता. गावात ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. या शोभात्रेद्वारे बाबांनी दिलेले अध्यात्म, करुणा, उदारता व एकात्मतेच्या विचारांचा जागर करण्यात आला.
या शोभायात्रेत प्रभाताई जंगले, लक्ष्मीताई कांबळे, विश्वनाथ मतकर, बापू देठे, माधव कांबळे, भानुदास देवकर, योहान कांबळे, बन्सी पंजरकर, दिनकर जवळकर, मुरलीधर लगड, संतोष कांबळे, शाहू कांबळे, किसन कांबळे, पोपट पाडळे, विश्वस्त रमेश जंगले, मेहेरनाथ कलचुरी, आयटकचे राज्य उपाध्यक्ष कॉ. अॅड. सुधीर टोकेकर, युनिट अध्यक्ष सतीश पवार, उपाध्यक्ष संजय कांबळे, राजू प्रसाद, गोपी काला, मोतीराम कांबळे, बन्सी कांबळे, नाथा फसले, दादू कांबळे, प्रभा पाचारणे, मंदा जाधव, मंगल कांबळे, विजय भोसले, सुनिता जावळे, सुनिल दळवी, राधाकिसन कांबळे, विकास कांबळे, दत्ता ससाणे, तानाजी कांबळे, विलास पुंड, सुभाष शिंदे, नवनाथ भिंगारदिवे, प्रविण भिंगारदिवे, अनिल फसले, विजय शिंदे, अविनाश भिंगारदिवे, जग्गू पुंड आदी सहभागी झाले होते.

शोभायात्रेचा समारोप मेहेराबादच्या टेकडीवर असलेल्या समाधी स्थळावर झाला. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी समाधीचे दर्शन घेतले. तर बाबांच्या सहवासात सेवा केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा व ट्रस्टच्या विश्वस्तांचा युनियनच्या वतीने सत्कार करण्यात आला. भाविकांना यावेळी प्रसादाचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.