• Mon. Jun 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

न्यायाच्या प्रतिक्षेतील वंचितांसाठी उन्नत चेतना न्यायाग्रह आंदोलन जारी

ByMirror

Dec 6, 2022

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पीपल्स हेल्पलाईन आणि भारती जनसंसदेची घोषणा

राष्ट्रीय उन्नत चेतना भवन निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न

अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारती जनसंसदेच्या पुढाकाराने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उन्नत चेतना न्यायाग्रह आंदोलन जारी करण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली. या आंदोलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय उन्नत चेतना भवन निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


स्वातंत्र्योत्तर 75 वर्षात या देशात रामराज्य येऊ शकले नाही. स्वराज्य ही संकल्पना मोडीत निघाली आणि त्याच वेळेला कायद्याचे राज्य हे सुध्दा खर्‍या अर्थाने राबविले गेले नाही. याला कारण म्हणजे या देशात उन्नत चेतनेचे राज्य आणता आले नाही. देशभरातील सर्व न्यायालयामध्ये फक्त वारी न्यायालयाचे काम चालते. पक्षकारांना आणि अन्याय ग्रस्तांना फक्त तारखा दिल्या जात असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


पक्षकारांना फक्त वर्षानुवर्ष न्यायाच्या प्रतिक्षेत तिष्ठत उभे रहावे लागत आहे. त्यामुळे या देशात उन्नत चेतनेचे राज्य आलेच पाहिजे. यासाठी हे आंदोलन जारी करण्यात आले आहे. देशात शिक्षणाचा मोठा प्रचार प्रसार झाला, परंतु शिक्षणाच्या माध्यमातून उन्नत चेतना प्राप्तीचा प्रयोग करण्यात आला नाही. त्यामुळे भ्रष्टाचार, अनागोंदी आणि टोलवाटोलवी दिल्लीपासून गल्ली पर्यंत सुरू आहे. मतदार मतविक्री करतात, व्होट माफिया मागच्या दाराने सत्ता प्राप्त करतात. त्यामुळेच देशात दारिद्रय वाढले आहे, बेरोजगारी वाढली आहे. बेघरांना घरे नाहीत, प्रत्येक शहरातील रस्ते खड्डयांनी भरलेले आहेत. याचा अर्थ सत्ता राबविणार्‍यांना फक्त स्वतःच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी सत्ता राबविण्याचे तंत्र माहित आहे. देशातील तमाम जनतेसाठी आणि निसर्गाच्या संवर्धनासाठी राजकर्त्यांना अजिबात तमा राहिली नाही. त्यामुळेच देशभर उन्नत चेतनेचा आग्रह आणि त्यासाठीचे उन्नत चेतना न्यायाग्रह आंदोलन जारी करण्यात आले असल्याचे अशोक सब्बन यांनी म्हंटले आहे.


दिल्ली येथे राष्ट्रपतीभवन आहे. त्या ठिकाणावरुन देशात कायदा राबविला जावा अशी अपेक्षा आहे. परंतु कायद्याचे राज्य ही संकल्पना फक्त 50 टक्क्या पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे देशात राष्ट्रीय उन्नत चेतना भवन निर्माण करण्यासाठी या संघटना प्रयत्नशील राहणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी स्पष्ट केले आहे.


ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्वतःच्या हितापेक्षा देशासाठी संपूर्ण आयुष्य खर्च केले. त्यांच्या आंदोलनामुळे देशात फार मोठे बदल देखील झाले. त्यामुळे राळेगणसिध्दी येथील अण्णा हजारे यांच्या कार्यसंकुलाला राष्ट्रीय चेतनाभवन असे नामकरण करण्याचा प्रस्ताव या संघटनांनी जनतेसमोर ठेवला आहे. शाळा कॉलेजमधून उन्नत चेतना प्राप्तीसाठीचे धडे देण्याची गरज आहे आणि प्रत्येक भारतीयाने उन्नत चेतना प्राप्तीच्या दिशेने पाऊल ठेवले पाहिजे. अन्यथा या देशात बकर्‍या, मेंढर्‍यांचे राज्य राबविले जाणार असल्याचे संघटनेचे म्हणने आहे. या आंदोलनासाठी सुधीर भद्रे, भगवान जगताप, प्रकाश थोरात, प्रा. पोपटराव पालवे, विजय भालसिंग आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *