पर्यावरण संवर्धनावर आधारित देखाव्याला एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने पुरस्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे गणेशोत्सवानिमित्त पर्यावरण संवर्धनावर आधारित देखावा सादर केलेल्या क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळास एकता फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने सर्वोत्कृष्ट देखावा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा सोसायटीचे संचालक अतुल फलके यांनी मंडळाचे अध्यक्ष दादा गायकवाड यांचा सत्कार केला. यावेळी अरुण अंधारे, रामदास पवार, सागर फलके, किरण जाधव, सचिन जाधव, सुधीर खळदकर, रितेश डोंगरे, नितीन चारुडे, राहुल फलके आदी उपस्थित होते.
क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त श्री गणेशाभोवती विविध झाडांची सजावट करुन पर्यावरणाचे महत्त्व सांगण्यात आले. तर वातावरणात झपाट्याने होणारे बदल व यामुळे सजीव सृष्टीवर होत असलेले दुष्परिणाम दर्शवून पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाचा संदेश देण्यात आला होता.
अतुल फलके म्हणाले की, क्रांतिवीर भगतसिंग मित्र मंडळाने समाजातील पर्यावरणाचा ज्वलंत प्रश्न हाताळून ग्रामस्थांमध्ये जागृती केली. वृक्षरोपण व संवर्धन काळाची गरज बनली असून, त्यांचा हा देखावा सर्वोत्कृष्ट ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. देखाव्यासाठी पप्पू चारुडे, शंकर गायकवाड, चिंटू पवार, नामदेव शिंदे, दिपक आंग्रे, अमोल जाधव आदी मंडळाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या देखाव्यास मंडप लाईटची सजावट मोहसीन शेख यांनी केली होती.
