एक गाव, एक गणपती राबविल्याचा सन्मान
एक गाव, एक गणपती ही संकल्पना विकासात्मक दृष्टीकोनाने आवश्यक -शिवाजी पालवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- एक गाव, एक गणपती ही संकल्पना विकासात्मक दृष्टीकोनाने आवश्यक आहे. यामुळे सर्व गाव एका विचाराने एकवटले जातात. युवक मंडळाच्या माध्यमातून जोडले जाऊन एकोप्याची भावना वाढीस लागून, गावाची विकासात्मक दिशेने वाटचाल होत असल्याचे प्रतिपादन जय हिंद फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे यांनी केले.
पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी या गावाने एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबविल्याबद्दल माजी सैनिकांच्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने ग्रामस्थांना विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पालवे बोलत होते. यावेळी फाउंडेशनचे शिवाजी गर्जे, महादेव शिरसाट, सरपंच रामनाथ शिरसाट, माजी सरपंच अंबादास डमाळे, भानुदास पालवे, आनंद शिरसाट, अशोक पोटे, संदीप शिरसाट, रतन शिरसाट, भैरू डमाळे, अनिकेत डमाळे, कर्ण डमाळे, संतोष डोंगरे, साहेबराव सानप, विक्रम सानप, अशोक डमाळे, ठकाजी डमाळे, मोहन शिरसाट, आदिनाथ डमाळे, सुखदेव डमाळे, गणेश शिरसाट, सतीश डमाळे, दगडू डमाळे आदी उपस्थित होते.

पुढे पालवे म्हणाले की, डमाळवाडी गावातील तरुणांनी एकत्र येऊन, जी गावकर्यांना साथ दिली ती खर्या अर्थाने प्रेरणादायी आहे. सर्व युवक एकवटल्याने गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचे सांगून गावाचे कौतुक केले.
जय हिंद फाउंडेशनच्या वतीने सरपंच रामनाथ शिरसाठ यांच्याकडे पुरस्कार सुपुर्द करण्यात आला. शिरसाट यांनी हा पुरस्कार म्हणजे संपुर्ण गावाचा सन्मान असून, गावाच्या विकासासाठी सर्व मतभेद विसरुन सर्व ग्रामस्थ व युवक एकजुटीने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
या पुरस्काराने गावामध्ये एक चैतन्य निर्माण झाले असून, गावामध्ये यावर्षी एक गाव एक गणपती संकल्पना पूर्णत्वास आली. यापूर्वी गावात दहा ते बारा गणेश मंडळ होती. परंतु गावाने एकत्र येऊन एक गाव, एक गणपतीचा निर्णय घेतला. जय हिंद फाउंडेशनने दिलेल्या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांनी फाऊंडेशनचे आभार मानले. जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून चांगले कार्य करणार्या गावांना पुढील काळात पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार असल्याची माहिती शिवाजी गर्जे यांनी दिली.
