• Fri. Mar 14th, 2025

छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेच्या पार्श्‍वभूमीवर शहरातून भव्य शोभायात्रा

ByMirror

Apr 21, 2023

उंट, घोडे, बैलगाडीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात निघालेल्या शोभायात्रेने वेधले नगरकरांचे लक्ष

स्पर्धेचे प्रथम बक्षीस अर्धा किलो सोन्याची गदा दक्षिणमुखी हनुमान चरणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रीत कुस्ती स्पर्धेसाठी शहरातून शुक्रवारी (दि.21 एप्रिल) सकाळी पारंपारिक वाद्यांसह शोभायात्रा काढण्यात आली. उंट, घोडे, बैलगाडीसह ढोल, ताशा, तुतारी, हलगीच्या निनादात निघालेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.


सर्जेपूरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात आरती करुन या शोभायात्रेचे प्रारंभ झाले. प्रारंभी छत्रपती शिवराय केसरी स्पर्धेसाठीचे प्रथम बक्षीस अर्धा किलो सोन्याची गदा दक्षिणमुखी हनुमान चरणी ठेवण्यात आली. यावेळी स्पर्धेचे संयोजक सुवेंद्र गांधी, अनिल शिंदे, जिल्हा तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष पै. वैभव लांडगे, वसंत लोढा, अभय आगरकर, महेंद्र गंधे, दिलीप सातपुते, भानुदास बेरड, सचिन जाधव, बाबूशेठ टायरवाले, सचिन पारखी, सुभाष लोंढे, प्रशांत मुथा आदींसह भाजप, शिवसेना व जिल्हा तालीम संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार असून, या पार्श्‍वभूमीवर शहरातून शोभायात्रा काढण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील व उपमहाराष्ट्र केसरी पै. महेंद्र गायकवाड यांच्यासह इतर मल्लांची उपस्थिती होती.

दोन व्हेंन्टेज कारमध्ये मल्लांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. सर्जेपूरा, कापडबाजार, माणिक चौक, पंचपीर चावडी मार्गे निघालेल्या शोभायात्रेने शहराचे वातावरण कुस्तीमय केले. मिरवणुकीचा समारोप शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिराच्या ठिकाणी झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *