• Sat. Mar 15th, 2025

ग्रामपंचायतींपुढे प्रधानमंडळसत्ताक ग्रामराज्याचा प्रस्ताव

ByMirror

Feb 2, 2023

गावांचा विकास लोकशाही मार्गाने अधिक गतिमान व व्यापक करण्यासाठीचा प्रयत्न

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंचायत राज पद्धती मधील जिल्हापरिषदेच्या नोकरशाहीच्या कचाट्यातून ग्रामपंचायती बाहेर काढण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने प्रधानमंडळसत्ताक ग्रामराज्याची संकल्पना जनतेसमोर मांडली. या प्रस्तावातून देशभरातील गावांचा विकास लोकशाही मार्गाने अधिक गतिमान व व्यापक करण्यासाठीचा प्रयत्न असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.


प्रत्येक गावासाठी प्रधानमंडळसत्ताक ग्रामराज्य चालविताना ते राज्य सरकार शासीत राहणार आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले होते. त्याच पद्धतीवर प्रत्येक गावासाठी ग्रामप्रधान मंडळ नेमण्याची कायद्याने तरतूद करावी, सरपंच यांना ग्राम आमात्य घोषित करण्यात यावे व त्यांच्या मदतीला जलसंधारण, महिला बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, शेती-पशुसंवर्धन, वाणिज्य ग्रामप्रधान अशा प्रकारे सरपंचासह इतर सर्व सदस्यांकडे ग्रामप्रधान म्हणून सत्ता देण्याची संकल्पना या प्रस्तावात संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.


सर्व ग्रामप्रधान मंडळामध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी ग्राम अमात्याकडे (सरपंच) ठेवण्यात यावी. ज्यामुळे ग्राम विकास हा ग्रामसभेच्या मदतीने एकात्मिक मार्गाने सर्वकषं करता येणार आहे. प्रत्येक गावामध्ये नॅनो बाजार भरविण्याचा देखील संघटनांनी प्रस्ताव मांडला आहे.


पंचक्रोशीतील मोठ्या गावाला उपतालुक्याचा दर्जा देऊन प्रत्येक तालुक्यात पाच उपतालुके निर्माण करण्यात यावे. यामुळे ग्रामीण भागात शिक्षण, आरोग्य त्याशिवाय शहरीकरणाचे सर्व फायदे मिळू शकणार आहेत. नवयुकांना गावाचा संपूर्ण विकास करण्याची संधी या नव्या तंत्राणे मिळणार असल्याचे संघटनेचे म्हणने आहे.


नगर तालुक्यातील नांदगाव येथील लोकनियुक्त सरपंच सखाराम सरक यांनी त्यांच्या गावात ग्रामप्रधान मंडळ उभे करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तर ते लवकरच ग्राम प्रधानमंडळ अस्तित्वात आणणार असल्याचे सरक यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या मुलांना व्यापार, उद्योगांमध्ये संधी मिळावी, त्याशिवाय स्थानिक बेकारी संपविण्यासाठी सुद्धा या नव्या तंत्राचा उपयोग होणार आहे. यासाठी राज्यभरातील गाव पुढार्‍यांशी संघटनेची चर्चा सुरू आहे. प्रजासत्ताक ग्रामराज्यासाठी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, सखाराम सरक, प्रकाश थोरात, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, डॉ. महेबूब सय्यद, विठ्ठल सुरम, डॉ. महेबुब सय्यद, अर्शद शेख, कैलास पठारे आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *