राष्ट्रीय युवा सप्ताह व सावित्री-ज्योती महोत्सव आयोजन बैठकीत विविध उपक्रम व स्पर्धांचे नियोजन
विविध उपक्रम व स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे युवक-युवतींना आवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- युवाशक्ती ही देशाच्या प्रगतीचा खरा आधार आहे. युवांमध्ये नावीन्यपूर्ण ऊर्जा असून बदल घडविण्याची मोठी क्षमता असते. युवाशक्तीच्या माध्यमातून देशाच्या विकासात सकारात्मक परिवर्तन घडू शकते. त्यासाठी युवकांना विविध क्षेत्रांत योग्य संधी दिल्या, तरच देश बदलू शकतो, असे प्रतिपादन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश योगेश पैठणकर यांनी केले.
जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत आणि जय युवा ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय युवा सप्ताह व सावित्री-ज्योती महोत्सवाच्या आयोजन बैठकीत ते बोलत होते. याप्रसंगी विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, जय युवाचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, ॲड. अनिता दिघे, ॲड. पोपट बनकर, ॲड. तुषार शेंडगे, ॲड. गायत्री गुंड, ॲड. आनंद सूर्यवंशी, ॲड. दिनेश शिंदे, रंजनीताई ताठे आदी उपस्थित होते.
पुढे न्यायाधीश पैठणकर म्हणाले की, युवा वर्गाने कोणत्याही काळात देशातील सामाजिक, राजकीय व आर्थिक क्रांती घडविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. असे प्रतिपादन त्यांनी जिल्हा न्यायालयातील विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात केले.
ॲड. सुरेश लगड यांनी सांगितले की, राष्ट्रीय युवा सप्ताह स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंतीच्या पार्श्वभूमीवर साजरा होत असल्याने हा सप्ताह अधिक ऊर्जादायी ठरतो. युवकांसाठी आयोजित विविध स्पर्धा व सामाजिक उपक्रमांमुळे त्यांचा स्वविकास होतो तसेच आकलनक्षमता वाढते. अधिकाधिक युवकांनी या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
ॲड. महेश शिंदे यांनी सांगितले की, युवा सप्ताहाच्या अनुषंगाने निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, वैयक्तिक नृत्य, समूह नृत्य, भजन, भारूड, चित्रकला, मेहंदी, ब्यूटी टॅलेंट शो, पथनाट्य आदी विविध स्पर्धांचे आयोजन कोहिनूर मंगल कार्यालय, गुलमोहोर रोड येथे करण्यात आले आहे. शाळा, महाविद्यालये, अकॅडमी तसेच विविध प्रशिक्षण घेणाऱ्या युवक-युवतींनी स्पर्धांसाठी 9579616484, 9657511869 या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास शासकीय प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक स्मृतिचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.
स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून नृत्यविशारद अनंत द्रविड, दिग्दर्शक तुषार रणनवरे, डॉ. अमोल बागुल, प्रा. हर्षल आगळे, सचिन साळवी, अनिल साळवे, सुजाता देवळाळीकर, गीतकार सुनील महाजन, सागर अलचेट्टी, दिपाली उदमले, आरती शिंदे, भाऊसाहेब पादीर आदी काम पाहणार आहेत.
युवा सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी मेरा युवा भारतचे जिल्हा समन्वय अधिकारी सत्यजित संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, राज्य क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, प्रविण कोंढावळे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, प्रियंका खिंडरे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याची माहिती संयोजिका जयश्री शिंदे यांनी दिली.
