दांडिया व गरबाचा उत्साह; विविध स्पर्धांनी रंगला दांडिया कार्यक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील जिव्हाळा ग्रुप आयोजित व महावीर ग्रुप प्रायोजित दांडिया नाईटमध्ये युवक-युवती दांडियाच्या तालावर थिरकली. पारंपारिक वेशभुषेतील युवती व महिला मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

टिळकरोड येथील नंदनवन लॉन येथे दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी उद्योजक राजेश भंडारी, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, महिला बँकेच्या व्हाईस चेअरमन मिनाताई चोपडा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. जिव्हाळा ग्रुपच्या अध्यक्षा अल्पना कासवा व सचिव सविता काळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
नॉन स्टॉप म्युझिक लाईट, डीजेने रंगत आलेल्या दांडिया नाईटमध्ये पारंपारिक वेशभूषेत महिला व युवक-युवतींच्या ग्रुपने दांडिया नृत्याचे बहारदार सादरीकरण केले. दांडिया नृत्याच्या कार्यक्रमात युवक-युवतींचा उत्साह संचारला होता. यामध्ये शहरासह जिल्ह्यातील दांडियाचे ग्रुप सहभागी झाले होते. महिलांनी महिलांसाठी राबविलेल्या या उपक्रमात महिलांचा प्रतिसाद लक्षणीय होता.
दांडिया नाईटमध्ये विविध स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मिस्टर जिव्हाळा, मिस जिव्हाळा, बेस्ट सोलो डान्सर, बेस्ट कपल डान्स, बेस्ट ड्रेसअप (महिला व पुरुष), बेस्ट ग्रुप डान्स (महिला व लहान मुले), बेस्ट कपल, बेस्ट ड्रेसअप, बेस्ट किड्स डान्सरचे आकर्षक सोने व चांदीचे बक्षिस देण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिव्हाळाच्या ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.
