क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करत आहे -चंद्रशेखर बावनकुळे
देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धा उत्साहात
नगर (प्रतिनिधी)- आपले सरकार क्रीडा धोरण पुढे घेऊन जात आहे. गावा-गावात
खेलो इंडियाच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सरकार करत आहे. सर्व जिल्ह्यातील गावागावातून विविध खेळाचे चॅम्पियन तयार झाले पाहिजे, क्रीडा क्षेत्राला महत्त्व देऊन क्रीडा धोरणाचे नियोजन करण्यात आले असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शेवगाव येथे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी बावनकुळे बोलत होते. खंडोबा मैदानावर झालेल्या या स्पर्धेसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, प्रताप (काका) ढाकणे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा या स्पर्धेचे आयोजक अरुण मुंढे, जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, नंदू मुंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन शिरसाठ, फारुक पटेल, सुनीलभाऊ धोत्रे, पप्पू शिरसाठ, बापूराव चव्हाण, युवराज पठारे, विक्रम बारवकर, तुषार वैद्य, अमोल सागडे, डॉ. कृष्णा देहाडराय, एकनाथ कुसळकर, अंकुश कुसळकर, मगर कडू, कमलेश गांधी, दिगंबर काथवटे, माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, विक्रम बारवकर, दिपक डावखर, रमेश दारकुंडे, विनोद मोहिते, सालार शेख, माऊली खेडकर, बाळासाहेब कोळगे, एकनाथ शिरसाठ, गणेश गर्जे, उदय मुंढे, सुनील जगताप, क्रीडा अधिकारी भाऊसाहेब वीर, माजी सैनिक विनोद शेळके, पप्पू केदार, अंकुश ढाकणे, सोमा मोहिते, अभी बडे, अंबू पहिलवान, प्रकाश चित्ते आदींसह संयोजन समितीचे सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बावनकुळे म्हणाले की, राज्यासह देशात लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जन्मशताब्दी सोहळा साजरा होत असताना वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेटची बैठक चोंडीला घेऊन 10 हजार कोटीचे कामे मंजूर करण्यात आली. देशात 5 हजारापेक्षा अधिक कार्यक्रम घेण्यात आले. अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या राज्यात जे कल्याणकारी उपक्रम राबवले, ते जसेच्या तसे महाराष्ट्रात राबविण्याचा सरकारचा संकल्प आहे. राज्यात पुढील पाच वर्षांनी प्रत्येक शेतकऱ्याला पाणी व 12 तास वीज मोफत मिळणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले.

राम शिंदे यांची कुस्ती थोड्या वरून हुकली, थोडी कुस्ती राहिली होती. त्यांच्या विरोधात जिल्ह्यात काही शक्ती घुसू पाहत आहे, षडयंत्र करून त्यांना कमजोर करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांना सभापती केल्याचा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी कुस्ती स्पर्धेचे अवघड नियोजन उत्तम प्रकारे करुन शेवगावमध्ये घेण्यात आलेल्या देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेच्या आयोजनाचे कौतुक केले. तर जिल्ह्यासह राज्यातून आलेल्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
प्रा. राम शिंदे म्हणाले की, एप्रिल, मे महिन्यात शेवगाव, पाथर्डी भागात जनावरांचा चारा, पाणी व टँकरचा प्रश्न उद्भवतो, मात्र देवाभाऊ कुस्ती स्पर्धेचे आयोजन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाऊस होवून ही स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आली. चांगला पाऊस झाल्याने चारा, पाणी व टँकरचा प्रश्न सुटून आनंदाचा क्षण या भागात निर्माण झाला आहे. या कुस्ती स्पर्धेत तीन महाराष्ट्र केसरी व आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूसह राज्यातून मल्ल सहभागी झाले, ही आनंदाची बाब आहे.

अलीकडे मैदानी खेळ कमी झाले आहे. महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळ खेळला गेला पाहिजे. या खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकात अरुण मुंढे यांनी गेली पंचवीस वर्षापासून राजकारण व समाजकारणात सक्रीय असून, त्यापूर्वी खेळाडू म्हणून मैदानावर होतो. पुन्हा खेळ जोपासण्यासाठी व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते या स्पर्धेचे खास आकर्षण असलेली महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील विरुद्ध महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर यांच्यात दीड लाख रुपयांवर, तर महिला विभागात नॅशनल मेडलिस्ट उषा कुमारी विरुद्ध नॅशनल मेडलिस्ट सोनाली मंडलिक यांच्यात एक लाख रुपयांवर निमंत्रित कुस्ती लावण्यात आली. दोन्ही कुस्त्या अत्यंत अटातटीच्या व रंगदार झाल्या. यामध्ये हर्षद सदगीर आणि सोनाली मंडलिक यांनी प्रतिस्पर्धी मल्लाला चितपट करुन विजय संपादन केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते त्यांना बक्षीस देण्यात आले. संध्याकाळी उशीरा पर्यंत फायनलच्या कुस्त्या सुरु होत्या. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी कुस्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.