• Wed. Jul 22nd, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

ByMirror

Aug 12, 2025
शहरात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

मानवी मूल्यांनी नटलेली आदिवासी संस्कृती जगासाठी आदर्श -प्राचार्य डॉ. माहेश्‍वरी गावित

सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य व निबंध स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर (प्रतिनिधी)- आदिवासी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शहरात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. टिळक रोड येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालयात जिल्ह्यातील समाजबांधव एकवटले होते. यावेळी आदिवासी संस्कृती, कला आणि वारसाचे दर्शन घडवणाऱ्या विविध उपक्रमांनी वातावरण भारावून गेले. आदिवासी सांस्कृतिक अभिमानाचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.


कार्यक्रमाचे प्रारंभ दिप प्रज्वलन, वृक्षपूजन व आदिवासींचे आदिम शस्त्र तिरकामठा यांचे पूजनाने करण्यात आले. प्रारंभी थोर क्रांतीवीर, दिवंगत समाज बांधव यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.डॉ. माहेश्‍वरी गावित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख वक्ते अथर्व साबळे, डॉ. शर्मिला सुभाष देशमुख, अभियंता किरण देशमुख, गायकड महेश रामचंद्र आडे आदी उपस्थित होते.


यावेळी नृत्य, निबंध व आदिवासी परंपरेची झलक दाखविणारे आदिवासी नृत्य स्पर्धा पार पडली. उपस्थिंनी या उपक्रमास भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधव, युवक व महिलांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. जल, जंगल, जमीन आमचा हक्क…या घोषणांनी परिसर दुमदुमला.


डॉ. माहेश्‍वरी गावित म्हणाल्या की, आदिवासी समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, समूहभावना, निसर्गाच्या प्रती कृतज्ञता, स्त्री- पुरुष समानता, चराचराकडे समदृष्टीने बघण्याची भावना, प्राणीप्रेम, माणुसकी आदी मानवी मूल्यांचा समावेश आहे. मानवी मूल्यांनी नटलेली आदिवासी संस्कृती जगासाठी आदर्श असून, निसर्गावर प्रेम करणारा, निसर्गाच्या सान्निध्यात राहणारा आदिवासीच पर्यावरणाचे रक्षण करू शकणार आहे. आदिवासी बांधवांनी जगाला आदर्शवत असणाऱ्या रूढी-परंपरा जपण्याचा प्रयत्न प्रत्येकाने जाणीवपूर्वक करण्याचे सांगितले. महिलांचा सन्मान हे आदिवासी समाजाचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्तविकात संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सावळे यांनी संस्थेच्या माध्यमातून आदिवासी समाजासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. अध्यक्षीय सुचना विद्या भांगरे यांनी मांडली. अमोल सोमनाथ चौधरी (उत्कृष्ट कर्मचारी भूमी अभिलेखन पुरस्कार प्राप्त), कु.उंबरे श्रुतिका गंगाराम (इ.8 वी शिष्यवृत्ती परीक्षा) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.


संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धा मुली प्रथम क्रमांक- कु.पाडवी रिंकू मोग्या (जीएनएम द्वितीय वर्ष), द्वितीय क्रमांक- कु. नाईक सुनंदा हरेंद्र (जीएनएम तृतीय वर्ष), तृतीय क्रमांक- कु. वायाळ कीर्ती एकनाथ (टीवाय बीएससी), खुला गट निबंध लेखन प्रथम क्रमांक- उदास मनाली नारायण (गृहपाल -शासकीय मुलींचे वस्तीगृह अहिल्यानगर), निबंध लेखन स्पर्धा मुले प्रथम क्रमांक – शिंगडा विजय रामजी (एमएसडब्ल्यू द्वितीय वर्ष), द्वितीय क्रमांक- पाडवी विजय तोरमा (बारावी, विज्ञान), तृतीय क्रमांक- भुसावरे रविंद्र जगन (बीएससी ॲग्री) या विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.


या कार्यक्रमासाठी आनंदा भागा भांगरे, मीरा भांगरे, अध्यक्ष जगन्नाथ सावळे, उपाध्यक्ष हिरामण नामदेव पोपेरे, सचिव कविराज चंदर बोटे, सहसचिव शिवानंद भांगरे, दिनकर भांगरे, भाऊराव नाडेकर, भरत साबळे, रामनाथ कचरे, विमलताई मुकणे, सुधा धिंदळे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊराव नाडेकर यांनी केले. आभार हिरामण पोपेरे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *