ठाणेला बदली झालेल्या माजी जिल्हा समन्वय अधिकारी व व्यवस्थापक महिलेविरोधात कारवाईची मागणी
नवरात्र उत्सवाच्या प्रारंभी बचत गटातील महिलांना आंदोलन करण्याची वेळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिला आर्थिक विकास महामंडळाचे तत्कालीन जिल्हा समन्वय अधिकारी (सध्या ठाणे येथे कार्यरत) यांनी कर्तृत्ववान लोकसंचालित संस्थेच्या व्यवस्थापक महिलेसह संगनमत करून संस्थेत व बचत गटांमध्ये आर्थिक गैरव्यवहार व अफरातफर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याविरोधात कर्तुत्ववान लोकसंचालित संस्थेच्या महिला सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
नवरात्र उत्सवाच्या प्रारंभीच महिलांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला असून, न्याय मिळवण्यासाठी आम्हाला दुर्गा रूप धारण करण्याची वेळ आणू नये, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. या आंदोलनात संस्थेच्या अध्यक्षा सिंधू वाणी, प्रतिभा गांधी, जयश्री झिने, निकिता कोरडे, संगीता महांडुळे, आरती रेगे, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा ॲड. स्वातीताई जाधव, राष्ट्रवादी जिल्हा महिला उपाध्यक्षा सुनिता वाल्हेकर, सोनाली वाघमारे आदींसह अनेक महिला सहभागी झाल्या होत्या.
महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी 11 जून 2019 ते 23 मे 2025 या कालावधीत अहिल्यानगर येथे कार्यरत होते. या काळात संस्थेच्या अध्यक्षा व कार्यकारिणी सदस्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले गेले. व्यवस्थापक महिलेला हाताशी धरून बचत गटातील योजनांमध्ये अनियमितता करून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
संस्थेच्या अध्यक्षपदावरून हटवण्याचा प्रयत्न, परस्पर सही बदलून आर्थिक व्यवहार, ठाण्याला बदली झाल्यानंतरही महिलांना त्रास, अशा गंभीर आरोपांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला आहे. महिलांनी सादर केलेल्या निवेदनात संस्थेचे ऑडिट हे धर्मदाय आयुक्तांच्या चौकशी अधिकाऱ्यामार्फत व्हावे, धर्मदाय आयुक्तांची आदेशाविना बँकेने सही बदल कसे केले, याची चौकशी व्हावी, महिला शेतकरी व उत्पादक शेतकरी यांच्याकडून सभासद फी म्हणून घेतलेले 1100 रुपये परत करावेत, कारण त्यातून कोणताही लाभ देण्यात आलेला नाही, स्मार्ट प्रकल्प व फूड प्रोसेसिंग युनिटच्या निधी खर्चाचा पारदर्शक अहवाल सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे. आरोपी अधिकारी व व्यवस्थापक महिलेवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नवीन जिल्हा समन्वय अधिकारी कार्यालयामध्ये बचत गटातील महिलांना अपमानस्पद बोलणे, मानसिक छळ करुन दमदाटी करण्याचे काम करत असल्याचा आरोप देखील महिलांनी केला आहे. त्यांची तत्काळ बदली करुन महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयात जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून महिला अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे.