• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

महिला कामगारांमध्ये हक्काची जाणीव करुन देऊन महिला दिन साजरा

ByMirror

Mar 11, 2026
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा सामाजिक उपक्रम

लाल बावटा बिडी कामगार युनियन, महिला समुपदेशन केंद्र व न्यायाधार संस्थेचा संयुक्त उपक्रम


हक्क आणि न्यायासाठी महिलांनी कृतीला गती द्यावी -ॲड. निर्मला चौधरी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- लाल बावटा बिडी कामगार युनियन, महिला समुपदेशन केंद्र व न्यायाधार संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “हक्क, न्याय मिळविण्यासाठी कृतीला गती द्या!” या ब्रीदवाक्याखाली जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्याबरोबरच न्याय मिळवण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले.


तोफखाना येथील लाल बावटा बिडी कामगार युनियनच्या कार्यालय परिसरात झालेल्या या कार्यक्रमाला विडी कामगार महिलांसह परिसरातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. न्यायाधार संस्थेच्या अध्यक्षा ॲड. निर्मला चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.


यावेळी महिला समुपदेशन केंद्राच्या मुख्य समुपदेशक शकुंतला लोखंडे, महिलांसाठी सातत्याने कार्य करणाऱ्या समाजसेविका सुमन काळापहाड, लाल बावटा विडी कामगार युनियनच्या उपाध्यक्ष कॉ. भारती न्यालपेल्ली, शोभा बिमन, संगीता कोंडा, सगुना श्रीफल, सुमित्रा जिंदम, बालमनी मीना, शारदा बोगा, माया चिल्का, पद्मा चाटला, शोभा आकुल, भाग्यलक्ष्मी गड्डम तसेच न्यायाधार संस्थेच्या सदस्या गौतमी भिंगारदिवे, शबाना शेख, ॲड. सुनिता गोरडे, ॲड. शुभांगी चौधरी, मयुरी भोर, दीक्षा देशमुख आदी उपस्थित होत्या.

अध्यक्षीय भाषणात ॲड. निर्मला चौधरी म्हणाल्या की, महिलांना हक्क व न्याय मिळवण्यासाठी स्वतः खंबीर होणे आवश्‍यक आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जगभरातील महिलांसाठी “हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी कृतीला गती द्या” ही संकल्पना देण्यात आली आहे. त्या संकल्पनेनुसार महिलांनी आपले अधिकार जाणून घेत त्यासाठी सक्रियपणे लढा दिला पाहिजे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार प्रत्यक्ष कृतीत उतरवून महिलांनी परावलंबित्वातून स्वावलंबनाकडे वाटचाल करणे गरजेचे आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, समाजातील निराधारत्व कमी करून महिलांनी स्वतः सक्षम बनत कुटुंब आणि समाजाला आधार देण्याची भूमिका घ्यावी. तसेच स्वतःच्या आरोग्याकडे वेळेवर लक्ष देऊन निरोगी जीवन जगणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आयुष्यात घेतलेले संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवून यशाच्या दिशेने सातत्याने प्रयत्न करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


महिला समुपदेशन केंद्राच्या मुख्य समुपदेशक शकुंतला लोखंडे यांनी महिलांना केंद्राच्या कार्याची माहिती दिली. कौटुंबिक व सामाजिक अडचणींमध्ये अडकलेल्या महिलांना समुपदेशन, मार्गदर्शन व कायदेशीर मदत देण्याचे काम केंद्रामार्फत केले जाते, असे त्यांनी सांगितले. अनेक महिलांना घरगुती हिंसाचार, आर्थिक अडचणी, कौटुंबिक मतभेद यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. अशा वेळी महिलांनी भीती न बाळगता समुपदेशन केंद्राचा आधार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.


कॉ. भारती न्यालपेल्ली यांनी महिलांना दैनंदिन आयुष्यात येणाऱ्या विविध अडचणींबाबत मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की, समाजात महिलांना अनेक प्रकारच्या प्रश्‍नांना सामोरे जावे लागते, मात्र त्या परिस्थितीत खचून न जाता धैर्याने मार्ग शोधणे आवश्‍यक आहे. शिक्षण, संघटन आणि जागरूकता यांद्वारे महिलांनी स्वतःला सक्षम बनवावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी समाजसेविका सुमन काळापहाड, गौतमी भिंगारदिवे तसेच ॲड. सुनिता गोरडे यांनीही महिलांना हक्क, आरोग्य व स्वावलंबन याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार ॲड. शुभांगी चौधरी यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *