• Thu. Jun 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

महिलांनी स्वप्न पाहून ते साकार करण्यासाठी झेप घ्यावी -संध्याताई गायकवाड

ByMirror

Mar 10, 2026
जनशिक्षण संस्थेत महिला दिनानिमित्त ‘स्त्री शक्तीचा जागर’

जनशिक्षण संस्थेत महिला दिनानिमित्त ‘स्त्री शक्तीचा जागर’

शहरासह ग्रामीण भागात व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या महिला प्रशिक्षिकांचा सन्मान

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महिलांमध्ये अपार क्षमता असून त्या कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात. फक्त महिलांनी स्वतःवर विश्‍वास ठेवून संकल्पाने कार्य करणे गरजेचे आहे. प्रत्येक महिलेकडे काही ना काही विशेष गुण असतात. आवड असलेल्या क्षेत्रात मनापासून काम केल्यास यश निश्‍चित मिळते. महिलांनी मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी धाडसाने पुढे झेप घ्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी संध्याताई गायकवाड यांनी केले.


भारत सरकारच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय संचलित जनशिक्षण संस्था येथे महिला दिनानिमित्त ‘स्त्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेमार्फत जिल्हाभर महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या महिला प्रशिक्षिकांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संध्याताई गायकवाड बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम, व्हाईस चेअरमन विजय इंगळे, चेअरपर्सन उषाताई गुंजाळ, व्यवस्थापकीय समिती सदस्य अनघा बंदिष्टी, विनोदा बेती, संस्थेचे प्रभारी संचालक शफाकत सय्यद, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे यांच्यासह प्रशिक्षिका, प्रशिक्षणार्थी युवती व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


गायकवाड पुढे म्हणाल्या की, आज महिला प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. शिक्षण, उद्योग, प्रशासन, विज्ञान, क्रीडा अशा अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी आपल्या कर्तृत्वाची छाप उमटवली आहे. छोट्या व्यवसायापासून ते मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यापर्यंत महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. महिलांनी एकमेकींचा सन्मान करणे ही समाज प्रगतीसाठी आवश्‍यक गोष्ट आहे. स्त्रीशक्तीची जाणीव ठेवून महिलांनी स्वतःला कमी लेखू नये, आत्मविश्‍वासाने पुढे जावे आणि आपल्या कुटुंबासह समाजाच्या विकासातही योगदान द्यावे, असेही त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात संस्थेचे प्रभारी संचालक शफाकत सय्यद यांनी जनशिक्षण संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, सन 2005 पासून संस्थेचे संस्थापक डॉ. राधेश्‍याम गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली युवक-युवती व महिलांना विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. मागील 21 वर्षांत संस्थेने मोठा टप्पा गाठला असून हजारो युवक-युवती आणि महिलांना स्वावलंबी बनविण्याचे कार्य संस्थेने केले आहे. शून्यातून सुरुवात करून यशस्वी उद्योजक बनलेल्या अनेक महिलांच्या यशोगाथा समाजासमोर उभ्या राहिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.


प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनीही आपले अनुभव व्यक्त करताना सांगितले की, जनशिक्षण संस्थेमुळे त्यांना आत्मनिर्भर होण्याची संधी मिळाली. विविध कौशल्य प्रशिक्षणामुळे व्यवसाय सुरू करण्याचे धैर्य मिळाले असून समाजात आत्मसन्मानाने उभे राहण्याचा आत्मविश्‍वासही वाढला आहे.


सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम म्हणाले की, भारत हा तरुणांचा देश आहे आणि महिलाही आज देशाच्या प्रगतीत मोठे योगदान देत आहेत. राष्ट्रपती पदापर्यंत महिला पोहोचल्या आहेत, ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. महिलांनी ठाम संकल्प करून वाटचाल केली तर त्या नक्कीच यशाची शिखरे गाठू शकतात, असे त्यांनी नमूद केले.


व्हाईस चेअरमन विजय इंगळे यांनी सांगितले की, महिलांमध्ये अनेक कलागुण असतात. त्यांना योग्य दिशा व प्रोत्साहन मिळाले तर त्या समाजात मोठे बदल घडवू शकतात. सहनशीलता, धैर्य, कष्ट करण्याची वृत्ती आणि एकाग्रता हे गुण महिलांमध्ये नैसर्गिकरित्या असतात. या गुणांच्या बळावर महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून देशाच्या विकासात सक्रिय भूमिका बजावत आहेत, असेही त्यांनी सांगितले.


या कार्यक्रमात प्रशिक्षणार्थी महिला व युवतींनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नृत्य, गीत आणि लघुनाटिकांच्या माध्यमातून स्त्रीशक्तीचा संदेश देण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात महिलांच्या कलागुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुंदा शिंदे यांनी केले, तर आभार अनिल तांदळे यांनी मानले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *