• Sun. Jul 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

वारीच्या भक्तिमय वातावरणात नेत्रदान- अवयवदानाचा जागर; वारकऱ्यांमार्फत समाजाला दिला जीवनदानाचा संदेश

ByMirror

Jul 19, 2026
‘मरणोत्तरही जगा... इतरांना जीवन द्या’; वारकऱ्यांच्या सहभागातून अवयवदानाचा संदेश

फिनिक्स सोशल फाऊंडेशन व जिल्हा रुग्णालयाचा अनोखा उपक्रम; दिंडीतून अवयवदान जनजागृती


‘मरणोत्तरही जगा… इतरांना जीवन द्या’; वारकऱ्यांच्या सहभागातून अवयवदानाचा संदेश


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी वारीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माला समाजप्रबोधनाची जोड देत शहरात अवयवदान चळवळीबद्दल जागृती करण्यात आली. नेत्रदान व अवयवदानासाठी सातत्याने जनजागृती करणाऱ्या फिनिक्स सोशल फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या अवयवदान समुपदेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.
शहरातील प्रमुख मार्गांवरून जाणाऱ्या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या हातात नेत्रदान व अवयवदानाचे महत्त्व सांगणारे जनजागृतीपर फलक व बॅनर देण्यात आले होते. “अवयवदान हेच श्रेष्ठ दान”, “नेत्रदानाने अंधांच्या जीवनात प्रकाश फुलवा”, “मरणोत्तर अवयवदानातून अनेकांना नवे जीवन मिळू शकते” अशा संदेशांद्वारे नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करण्यात आले.
दिंडी मार्गावरील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अवयवदानाविषयी माहिती जाणून घेतली. अनेकांनी अवयवदानाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. धार्मिक आणि सामाजिक संदेशाची सांगड घालत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समाजात अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली.
या जनजागृती मोहिमेत फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे तसेच अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे अवयवदान समुपदेशक सतीश आहिरे यांनी वारकऱ्यांसोबत सहभाग नोंदवत नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे म्हणाले, अवयवदान आणि नेत्रदान ही मानवतेची सर्वोच्च सेवा आहे. एका व्यक्तीच्या मरणोत्तर अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, तर नेत्रदानामुळे अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाश निर्माण होतो. धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमधून जनजागृती केल्यास हा संदेश मोठ्या प्रमाणावर समाजापर्यंत पोहोचतो. प्रत्येक नागरिकाने अवयवदानाचा संकल्प करून आपल्या कुटुंबीयांनाही त्याबाबत माहिती देण्याचे त्यांनी आवाहन केले.
जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतीश आहिरे म्हणाले की, अवयवदानाबाबत समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत. योग्य माहिती आणि जनजागृतीद्वारे हे गैरसमज दूर करणे आवश्‍यक आहे. अवयवदानामुळे अनेक गंभीर रुग्णांना जीवनदान मिळू शकते. प्रत्येकाने अवयवदानाबाबत सकारात्मक विचार करून शासनाच्या अधिकृत प्रक्रियेनुसार नोंदणी करावी. अशा जनजागृती मोहिमा समाजात मोठा सकारात्मक बदल घडवून आणता येणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला.
मा. संपादक कृपया प्रसिध्दीसाठी……………….

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *