• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

वारीत सेवाभावाचा आरोग्यसंगम! सहाशे वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Jul 15, 2026
‘वारकऱ्यांचे आरोग्य जपणे हीच खरी विठ्ठल सेवा’ -डॉ. संतोष गिऱ्हे

उमंग फाउंडेशन व जिल्हा क्रीडा कार्यालयाचा उपक्रम; औषधांसह फळवाटप

‘वारकऱ्यांचे आरोग्य जपणे हीच खरी विठ्ठल सेवा’ -डॉ. संतोष गिऱ्हे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या वारीनिमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत सेवाभावाचा आदर्श उपक्रम उमंग फाउंडेशन आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. युवक कल्याण योजनेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात तब्बल सहाशे वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉक्टरांनी प्रत्येक वारकऱ्याची सखोल वैद्यकीय तपासणी करून आवश्‍यकतेनुसार औषधांचे वाटप केले. याशिवाय वारकऱ्यांना फळांचेही वितरण करण्यात आले.

शहरातील कोंबडी मळा, सोलापूर चौक आणि वाळुंज परिसरात आयोजित या शिबिराला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांसाठी अशा प्रकारची आरोग्य सेवा अत्यंत उपयुक्त ठरली. तपासणीदरम्यान रक्तदाब, शारीरिक तक्रारी, थकवा, ताप, पायदुखी आदी समस्यांवर मार्गदर्शन करून आवश्‍यक औषधोपचार देण्यात आले.

यावेळी उमंग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. संतोष गिऱ्हे, पोपट बनकर, डॉ. धीरज ससाणे, वैशाली कुलकर्णी, महेंद्र गिऱ्हे, शरद वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. स्वयंसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने वारकऱ्यांची नोंदणी, तपासणी आणि औषध वाटपाची व्यवस्था सांभाळली.
यावेळी बोलताना डॉ. संतोष गिऱ्हे म्हणाले की, वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि सामाजिक परंपरेचे प्रतीक आहे. पंढरीच्या दिशेने श्रद्धेने निघालेल्या वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहणे ही काळाची गरज आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवण्यासाठी अशा आरोग्य शिबिरांचे विशेष महत्त्व आहे. त्यामुळे दरवर्षी हा उपक्रम सातत्याने राबविला जात असून भविष्यातही ही सेवा सुरू राहणार असल्याचे सांगितले.

पोपट बनकर यांनी सांगितले की, वारकरी समाज हा श्रद्धा, सेवा, समता आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देणारा समाज आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. त्याच भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला असून वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य पाहून आमच्या कार्याला खरी प्रेरणा मिळते.
शिबिरादरम्यान डॉ. संतोष गिऱ्हे यांनी स्वतः वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्‍यक वैद्यकीय सल्ला दिला, तर डॉक्टरांच्या पथकाने औषधांचे वितरण केले. तपासणीनंतर प्रत्येक वारकऱ्याला फळांचे वाटप करून त्यांच्या आरोग्यदायी प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या संपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयाचे विशेष सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *