• Sat. Jul 25th, 2026

Mirrornews24

Marathi News

वारकरी वेशातील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष; पालकांना रोपांचे वाटप करून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

ByMirror

Jul 24, 2026
श्रमिकनगर परिसर दणाणला बाल वारकऱ्यांच्या दिंडीने

श्रमिकनगर परिसर दणाणला बाल वारकऱ्यांच्या दिंडीने

लेझीम, ढोल-ताशे, ग्रंथदिंडी, रिंगण सोहळा अन्‌ भक्तिरसाचा जल्लोष; विद्यार्थी, पालक व शिक्षकांचा रंगला रिंगण सोहळा


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीच्या पार्श्‍वभूमीवर श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक, माध्यमिक व बालक मंदिर विद्यालयाच्या वतीने भिस्तबाग परिसरात भव्य बाल वारकरी दिंडी सोहळा उत्साहात पार पडला. विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ-मृदुंगाच्या निनादात, लेझीम आणि ढोल पथकाच्या दणदणाटात निघालेल्या या दिंडीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. यंदाच्या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे भक्तीसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पालकांना रोपांचे वाटप करण्यात आले.


दिंडीची सुरुवात सकाळी नऊ वाजता विद्यालयाच्या प्रांगणात विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. संस्थेचे विश्‍वस्त राजेंद्र म्याना आणि सौ. स्मिता म्याना यांच्या हस्ते पूजन संपन्न झाले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक सब्बन, नगरसेवक मनोज दुलम, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष शंकर येमूल, श्रमिक जनता हौसिंग सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम, माजी मुख्याध्यापिका विद्या दगडे, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. भारती गाडेकर, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सुलभा सुरकुटला तसेच मान्यवर उपस्थित होते.


दिंडीच्या अग्रभागी सजविलेल्या पालखीसमोर विद्यार्थ्यांनी लेझीमचे आकर्षक डाव सादर केले. टाळ, मृदुंग, वीणा आणि भगवे ध्वज हातात घेऊन बाल वारकरी “विठ्ठल विठ्ठल… विठ्ठला हरी ओम विठ्ठला…”, “ज्ञानबा-तुकाराम…”, “माऊली… माऊली…” अशा भक्तिगीतांच्या तालावर तल्लीन झाले होते. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे परिसरात भक्तिरसाची अनुभूती निर्माण झाली.
यंदाच्या दिंडीतील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांनी काढलेली भव्य ग्रंथदिंडी. संत साहित्य, ज्ञानपरंपरा आणि वाचन संस्कृतीचा संदेश देणाऱ्या या ग्रंथदिंडीचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. विद्यालयाच्या परिसरात विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी रांगोळीच्या माध्यमातून विठ्ठल-रुक्मिणीचे सुंदर चित्र साकारले होते.


बालवाडीपासून दहावीपर्यंतचे सर्व विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. मुलांनी वारकरी संप्रदायाचा पारंपरिक पोशाख परिधान केला होता, तर विद्यार्थिनींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभाग नोंदविला. विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव, संत तुकाराम, मुक्ताबाई, मीराबाई, श्रीकृष्ण आणि राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी दिंडीचे विशेष आकर्षण ठरवत उपस्थितांची मने जिंकली.


श्रमिकनगर येथील बालाजी मंदिरासमोर विद्यार्थ्यांनी पारंपरिक रिंगण सोहळा सादर केला. या प्रसंगी विद्यार्थिनी आणि शिक्षिकांनी फुगड्यांचा फेर धरत वारकरी परंपरेतील सांस्कृतिक वारसा जपला. दिंडी मार्गावरील विविध चौकांमध्ये पालखीचे स्वागत करण्यात आले. लहानग्या वारकऱ्यांचा उत्साह पाहण्यासाठी नागरिक आणि पालकांनी मोठी गर्दी केली होती.
या दिंडीतून पर्यावरण संवर्धनाचा संदेशही देण्यात आला. दिंडी पाहण्यासाठी आलेल्या पालकांना विद्यार्थ्यांच्या हस्ते विठ्ठलाचा प्रसाद म्हणून रोपांचे वाटप करण्यात आले. ही रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केले. भिस्तबाग चौक आणि वैदूवाडी मार्गे दिंडीचे मार्गक्रमण झाल्यानंतर पुन्हा विद्यालयाच्या प्रांगणात तिचा समारोप करण्यात आला. संपूर्ण उपक्रम प्राथमिक व माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *