विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
महात्मा फुले यांनी विषमतेविरुद्ध लढा देऊन समता प्रस्थापित केली -सुनिल सकट
नगर (प्रतिनिधी)- महात्मा फुले यांनी मागासवर्गीय मुलांसाठी पहिली शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक दिवसानिमित्त महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त सुनील सकट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन आगळ्यावेगळ्या पध्दतीने महात्मा फुले यांना अभिवादन करण्यात आले.
नगर-कल्याण रोड येथे झालेल्या कार्यक्रमाच्या प्रारंभी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी सुनिल सकट, सरिता आष्टेकर, रंजना बर्वे, ऋतुजा नाट, वर्षा उबाळे, निकिता उबाळे, पूजा दातरंगे, गायत्री दातरंगे, आरती सकट, वंदना सकट आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
सुनिल सकट म्हणाले की, 3 जुलै 1852 मध्ये महात्मा फुले यांनी मागासवर्गीय समाजातील मुलांसाठी पहिली शाळा सुरू केली. त्यांनी शैक्षणिक चळवळ चालवून समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या योगदानातून मागासवर्गीय आणि वंचित घटकांना शिक्षणाची संधी मिळाली. महात्मा फुले यांनी समाजातील विषमते विरुद्ध लढा दिला आणि शिक्षणाच्या माध्यमातून समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आजही त्यांचे कार्य सर्व समाजासाठी दीपस्तंभ असल्याचे त्यांनी सांगितले.