• Tue. Jul 1st, 2025

राहुरी फॅक्टरी येथील हॉलीबॉल मैदान परिसरात वृक्षारोपण

ByMirror

Jun 25, 2025

विद्यार्थी व खेळाडूंना रोपांचे वाटप; एक व्यक्ती, एक झाड उपक्रम


जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत व उमेद सोशल फाउंडेशनचा पुढाकार

नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड उपक्रमातंर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत व उमेद सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी फॅक्टरी येथील हॉलीबॉल मैदान परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. या अभियानात सहभागी झालेल्या विद्यार्थी व खेळाडूंना रोपांचे वाटप करुन घराच्या परिसरात लावण्याचे व त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले.


या उपक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे उपाध्यक्ष व शाखाप्रमुख कुणाल तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून साई आदर्श मल्टीस्टेटचे संस्थापक शिवाजी कपाळे, हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र पुजारी, फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब सगळगीळे, कार्यकारी अधिकारी राजेश मंचरे, संघटक श्रीकांत राऊत, ज्ञानेश्‍वर माने, संदीप पंडित आदी उपस्थित होते.


शिवाजी कपाळे म्हणाले की, पर्यावरण रक्षण ही आजची गरज असून, प्रत्येकाने एक झाड लावले तरी उद्याचे जग हरित आणि निरोगी होईल. वृक्ष हीच खरी संपत्ती आहे. एक झाड लावणे म्हणजे भविष्यातील पिढीसाठी छायादार, प्रदूषणमुक्त वातावरण निर्माण करणे. हा उपक्रम निश्‍चितच अनुकरणीय आहे. विद्यार्थ्यांनी या उपक्रमातून प्रेरणा घ्यावी आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारी घेण्याचे त्यांनी सांगितले.


कुणाल तनपुरे यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य शिबिरे, महिला सक्षमीकरण, तसेच पर्यावरण संवर्धनासाठी विविध प्रकल्प राबवले जात असल्याचे सांगून, विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. बाळासाहेब सगळगीळे यांनी विद्यार्थ्यांना वृक्षांचे पर्यावरणीय, औषधी व सामाजिक महत्त्व समजावून सांगितले.


या उपक्रमासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रवीण कोंढावळे, प्रियंका खिंडारे, जय असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. महेश शिंदे, उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष अनिल साळवे, सचिव सचिन साळवी, खजिनदार संजयजी निर्मळ, प्रमुख सल्लागार ॲड. दीपक धीवर यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *