• Sun. Nov 2nd, 2025

जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीचे तीन खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड

ByMirror

Nov 1, 2025

अश्‍कान काझी, किरण चोरमले आणि रोनक अंदानी करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमी आणि अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या तीन खेळाडूंची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. यामध्ये अश्‍कान काझी, किरण चोरमले आणि रोनक अंदानी यांचा समावेश आहे.


बीसीसीआयच्या 23 वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू स्पर्धेसाठी अश्‍कान काझी आणि किरण चोरमले यांची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली असून, हे दोघेही एकत्र राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. तर 19 वर्षांखालील विणू मांकड स्पर्धेसाठी रोनक अंदानी याची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.


किरण चोरमले हा उजव्या हाताचा फलंदाज व फिरकी गोलंदाज असून, यापूर्वी त्याने 19 वर्षांखालील आशिया चषकात भारताचे प्रतिनिधित्व करून जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे.


अश्‍कान काझी हा डावखुरा फलंदाज तसेच डावखुरा फिरकी गोलंदाज असून, त्याने अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघ व महाराष्ट्र राज्य संघासाठी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. निवड चाचणी सामन्यांमध्ये प्रभावी फलंदाजी करून त्याने ही संधी मिळवली आहे.


रोनक अंदानी हा उजव्या हाताचा जलदगती गोलंदाज असून, त्याने जिल्हा अंतर्गत आणि निवड चाचणी सामन्यांमध्ये अचूक गोलंदाजी करत अनेक बळी मिळवले आहेत. त्याच्या कामगिरीमुळे त्याची निवड महाराष्ट्र राज्य संघात झाली आहे.


हे तिन्ही खेळाडू हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमी, अहिल्यानगर येथे प्रशिक्षक सरफराज बांगडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात.


या खेळाडूंच्या निवडीबद्दल आमदार संग्राम जगताप, अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव गणेश गोंडाळ, सहसचिव प्रा. माणिक विधाते तसेच हुंडेकरी अकॅडमीचे संस्थापक वसीम हुंडेकरी यांनी अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *