• Sat. Oct 31st, 2026

Mirrornews24

Marathi News

आईच्या काळजाचा आक्रोश! चार वर्षांची चिमुकली कोमात; उपचारासाठी समाजाच्या मदतीची गरज

ByMirror

Oct 30, 2026
चिमुकलीच्या आयुष्यासाठी आईची धडपड; मेंदूच्या गंभीर आजारामुळे उपचारांचा खर्च आवाक्याबाहेर

नियतीचे दुहेरी संकट! घटस्फोटानंतर मुलीच्या गंभीर आजाराशी आईचा संघर्ष; उपचारासाठी आर्थिक मदतीचे आवाहन


चिमुकलीच्या आयुष्यासाठी आईची धडपड; मेंदूच्या गंभीर आजारामुळे उपचारांचा खर्च आवाक्याबाहेर


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- एका बाजूला घटस्फोटानंतर आयुष्याचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला चार वर्षांच्या चिमुकलीचा गंभीर आजार… अशा दुहेरी संकटाचा सामना करणाऱ्या प्रियंका संतोष बिल्लांडे या आईला आता समाजाच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे. त्यांच्या चार वर्षीय मुलीला मेंदूशी संबंधित गंभीर आजाराने ग्रासले असून, सध्या ती कोमात असल्याची माहिती आहे. मुलीच्या पुढील उपचारांसाठी डॉक्टरांनी मोठ्या खर्चाची आवश्‍यकता असल्याचे सांगितले आहे. मात्र, आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने मुलीचे उपचार सुरू ठेवणे आईसाठी कठीण झाले आहे. त्यामुळे दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था आणि मदतीसाठी पुढे येणाऱ्या नागरिकांनी आर्थिक हातभार लावावा, असे भावनिक आवाहन करण्यात आले आहे.


प्रियंका बिल्लांडे या सध्या अहिल्यानगरमधील तपोवन रोड परिसरात आपल्या माहेरी वास्तव्यास आहेत. मुलीच्या जन्मानंतर त्यांना वैवाहिक आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागला आणि घटस्फोटाला सामोरे जावे लागले. मुलीच्या संरक्षणासंदर्भातील प्रकरण न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अशा परिस्थितीत मुलीच्या संगोपनाची आणि उपचारांची संपूर्ण जबाबदारी पेलण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.


जन्मानंतर काही काळातच या चिमुकलीला गंभीर आजाराचा सामना करावा लागला. तिच्यावर माळीवाडा येथील महालक्ष्मी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या उपचारांवर कुटुंबीयांनी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. उपचारांमुळे काही प्रमाणात सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले; मात्र त्यानंतर मुलगी कोमात गेली. मेंदूशी संबंधित विकारामुळे पुढील उपचार आवश्‍यक असून, त्यासाठी मोठा खर्च येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.


प्रियंका बिल्लांडे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे. त्यांचे वडील एका खासगी दुकानात काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने आतापर्यंतचा उपचारांचा खर्च पेलताना कुटुंबाची आर्थिक ओढाताण झाली आहे. आता पुढील उपचारांसाठी आवश्‍यक असलेली मोठी रक्कम उभी करणे त्यांच्यासाठी अशक्यप्राय झाले आहे.
एका आईसाठी आपल्या चिमुकलीला पुन्हा निरोगी पाहण्यापेक्षा मोठे स्वप्न कोणतेच नसते. मात्र, आर्थिक अडचणींमुळे मुलीच्या उपचारांमध्ये अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा. आपल्या छोट्याशा मदतीतूनही या चिमुकलीच्या उपचारांना मोठा आधार मिळू शकतो. त्यामुळे नागरिकांनी शक्य होईल तेवढी आर्थिक मदत करून माणुसकीचे नाते जपावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आर्थिक मदतीसाठी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा : सावेडी, अहिल्यानगर, खाते क्रमांक : 60231517064 किंवा यूपीआय नंबर 7666230018

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *