पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या चिमुकल्यांच्या सादरीकरणाने वेधले लक्ष; कार्यक्रमाद्वारे जीवनमूल्यांचा संदेश
मुलांना जसे घडवू, तसेच उद्याचे राष्ट्र घडेल -कर्नल अभिषेक पटवर्धन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी “कहानियों का सफर” घडवित वार्षिक स्नेहसंमेलनात रंग भरले. चिमुकल्या बालचमूंनी सादर केलेल्या देखण्या व भावपूर्ण सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली.

एल.के.जी., यु.के.जी. तसेच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे आपल्या जीवनातील महत्त्व गोष्टींच्या माध्यमातून अत्यंत प्रभावीपणे मांडले. जंगल बुक मधून मिळणाऱ्या जीवनमूल्यांची शिकवण, स्वातंत्र्यवीरांच्या प्रेरणादायी कथा, तेनाली रामनच्या बोधकथा तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यगाथेचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून प्रभावीपणे मांडून उपस्थित प्रेक्षक व पालकांना मंत्रमुग्ध केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष कर्नल अभिषेक पटवर्धन आणि सौ. राधिका पटवर्धन यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. विद्यालयातील या बालचमूनीं ईशस्तवन व स्वागत गीतद्वारे पाहुण्यांचे स्वागत केले. प्रारंभी रुपीबार्इ मोतीलाल बोरा न्यू इंग्लिश स्कूलच्या एनसीसीच्या विद्यार्थिनींनी पाहुण्यांना बॅण्ड पथकासह सलामी दिली.
मोने कला मंदिरात झालेल्या या कार्यक्रमास संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहसचिव गौरव फिरोदिया, सल्लागार मंडळाच्या सदस्या भूषण भंडारी, पुष्पा फिरोदिया, सुनीता मुथा, मिनाताई बोरा विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्य कविता सुरतवाला, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, पूर्व-प्राथमिक विभाग प्रमुख ज्योती सुद्रिक, विद्यार्थी प्रतिनिधी वरद लोखंडे व विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रावणी देशमुख यांच्यासह सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, शालेय जीवन आयुष्याचा पाया आहे. जेवढा पाया मजबूत तेवढे यशस्वी जीवन उभे राहणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही उपयुक्त असली तरी तिचा योग्य वापर होणे गरजेचे असून, शैक्षणिक जीवनात तिचे विशेष महत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. तर शाळेत गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विविध उपक्रम राबविणारे प्राचार्य भाबड व संपूर्ण शिक्षक वर्गाचे कौतुक केले. शालेय मुला-मुलींनी रोप मल्लखांबावर चित्तथरारक खेळाचे प्रदर्शन घडवून उपस्थितांची दाद मिळवली.
प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख मुलाखतीद्वारे करत असताना त्यांचा जीवनप्रवास उलगडला. कर्नल अभिषेक पटवर्धन यांनी आपल्या मुलाखतीतून आपल्या कुटुंबातील चार पिढ्या देशसेवेत कार्यरत असल्याचा उल्लेख केला. लहानपणापासूनच भारतीय सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी ‘पराक्रम व्हिजन’ विषयी मार्गदर्शन करत मिलिटरी डिप्लोमसी म्हणजे काय, हे सर्वसामान्यांना समजेल अशा सोप्या भाषेत स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी संरक्षण सेवांमधील अनुभव कथन करत आफ्रिकेतील कार्यकाळातील अनुभवही उपस्थितांसमोर मांडले. डिफेन्स सर्व्हिसमध्ये कार्य करताना केलेला अभ्यास, घेतलेली मेहनत आणि त्यातून आलेले हिमालयातील थरारक अनुभव त्यांनी सांगितले. आपल्या कारकिर्दीत मिळालेल्या चार विविध पुरस्कारांची माहिती त्यांनी दिली. तसेच, सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींच्या त्यागाचे व योगदानाचे त्यांनी मनापासून कौतुक केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “आजची ही लहान मुले म्हणजे देशाचे भविष्य आहे. आपण त्यांना जसे घडवू, तसेच उद्याचे राष्ट्र घडेल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या बालपणाविषयी, शैक्षणिक प्रवासाविषयी, आदर्श व्यक्ती व त्यांनी निवडलेल्या क्षेत्राविषयी कुतूहलपूर्ण प्रश्न विचारत ढसाळ अनुजा व गुगळे सावी या चिमुकल्या विद्यार्थिनींनी प्रमुख पाहुण्यांना प्रभावीपणे बोलते केले.
उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभाच्या यादी वाचनाचे काम मिनसा तांबटकर हिने केले. प्रथम सत्राचे सूत्रसंचालन अनन्या गारुडकर व आरव साबळे यांनी केले, तर आभार सार्थ भंडारी व मुसफिरा शेख यांनी केले. स्नेहसंमेलनातील विविध गुणदर्शन कार्यक्रमांचे सूत्रसंचालन ढवळे शुभदा व जाधव मल्हार यांनी केले. या स्नेहसंमेलनास पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्नेहसंमेलनाची सांगता वंदेमातरम गाऊन करण्यात आली.
