विश्वेश्वर प्रतिष्ठान आयोजित प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
स्टेशन स्टार्स संघ विजेता; एकनाथ नगर उपविजेता व वांबोरी संघ ठरला तृतीय
स्पर्धा म्हणजे जिंकणे-हरणे नव्हे, तर आपल्या क्षमतेचा शोध घेणे -भानुदास कोतकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव, नगर-नेप्ती रोड येथील विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित भव्य फ्लडलाईट्स प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. तब्बल अकरा दिवस रात्रंदिवस रंगलेल्या सामन्यांनी केडगावच्या मैदानात क्रिकेटचा उत्सव भरला होता. शहरासह नगर तालुक्यातील विविध संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
या स्पर्धेच्या विजेतेपदाचा मान स्टेशन स्टार्स संघाने पटकावला, तर एकनाथ नगर संघाने द्वितीय, आणि वांबोरी संघाने तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्या संघांना अनुक्रमे संतोष कोतकर यांच्या वतीने 31 हजार, मयूर जगदाळे यांच्या वतीने 21 हजार, आणि संतोष बोरा यांच्या वतीने 11 हजार रुपयांची पारितोषिके देण्यात आली. भानुदास कोतकर यांनी क्रिकेटचा उत्साह पाहून 11 हजारांचे बक्षीस जाहीर केले. तसेच अनेकांनी वैयक्तिक बक्षिसापोटी दिलेल्या रकमेतून तब्बल 51 हजारांचे बक्षीस विजेत्या संघाला देण्यात आले. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण ज्येष्ठ नेते भानुदास एकनाथ कोतकर यांच्या हस्ते झाले. सागर सातपुते यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा पार पडली. या वेळी गणेश सातपुते, जयदत्त खाकाळ, शशिकांत आठरे, निलेश सातपुते, अशोक कराळे, भुषण गुंड, सचिन सातपुते, संतोष (नाना) कोतकर, मयूर जगदाळे, कुमार होळकर, भुषण गुंड, शशिकांत आठरे, बेरड सर, जयदीप खाकाळ, दादू चौगुले, सुनील उमाप, एकनाथ जपकर, प्रतिक कोतकर, कैलास कोतकर, संजय जपकर, कैलास भुककन, नितीन आजबे, महेश सरोदे, विशाल सकट, बाळासाहेब सातपुते, संजू खामकर, गणेश कराळे, दत्ता कोतकर, मनोज येरकर, आनंद धनक, प्रकाश इथापे, निखिल जगदाळे, योगेश शिंदे, पोपट कराळे, महेश घोडके, करण केकांत, करण गोफणे, संतोष बोरा आदींसह केडगाव ग्रामस्थ उपस्थित होते.
भानुदास कोतकर म्हणाले की, केडगावमध्ये विकासाबरोबरच क्रीडा क्षेत्राला चालना देण्याचे काम सातपुते परिवाराच्या वतीने सातत्याने होत आहे. समाजात एकता, शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण करण्याचे साधन म्हणजे खेळ. आज या मैदानावर तरुणांचा उत्साह पाहून आनंद होत आहे. पुढील काळात या भागातील खेळाडूंना चांगल्या सोयी-सुविधा निर्माण करुन देण्याचा प्रयत्न राहणार आहे. स्पर्धा म्हणजे जिंकणे-हरणे नव्हे, तर आपल्या क्षमतेचा शोध घेण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
सागर सातपुते म्हणाले की, शहर व ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या फ्लडलाईट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व संघांनी उत्कृष्ट खेळ करून ग्रामीण क्रिकेटचा दर्जा उंचावला आहे. यामधून अनेक तरुणांना आपल्या खेळगुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. येत्या काळात अशाच स्पर्धा मोठ्या प्रमाणात घेऊन, तरुणांच्या खेळाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सामन्यांचे समालोचन विश्वेश्वर प्रतिष्ठान, संदीप दादा कोतकर युवा मंच तसेच उदयनराजे नगर क्रिकेट खेळाडूंनी केले… आभार सागर सातपुते व प्रकाश इथापे यांनी मानले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गणेश भाऊ सातपुते मित्र मंडळ, विश्वेश्वर क्रिकेट मित्र मंडळ आणि संदीप दादा कोतकर युवा मंचच्या सदस्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
