जालिंदर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली फिनिक्स फाऊंडेशनचा सामाजिक वसा
1160 अंधांना मिळाली नवदृष्टी; आता फिनिक्स नेत्रालय साकारतेय स्वप्न
नगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील छोट्याशा नागरदेवळे गावातून सुरू झालेली नेत्रदान चळवळ आज राज्यभर परिचित झाली असून, या चळवळीचा केंद्रबिंदू ठरले आहेत जालिंदर बोरुडे. जलसंपदा विभागात कार्यरत राहून व सेवानिवृत्त झाल्यानंतरही समाजसेवेचा ध्यास घेतलेले हे अवलिया गेली 33 वर्षे नेत्रदान व मोतीबिंदू शस्त्रक्रियांच्या माध्यमातून लाखो गरजूंना प्रकाश दाखवत आहेत. त्यांच्या फिनिक्स सोशल फाऊंडेशन माध्यमातून आतापर्यंत 1160 अंधांना मरणोत्तर नेत्रदानातून नवदृष्टी मिळाली आहे. या चळवळीने अनेकांचे जीवन उजळले असून, समाजात नेत्रदानाबाबत जागृती निर्माण झाली आहे.
1991 साली स्वत:च्या आईला आलेल्या अंधत्वामुळे जालिंदर बोरुडे यांनी गरजूंना नेत्रदोषाचे मोफत उपचार मिळण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशनच्या माध्यमातून मोफत शिबिर घेऊन नेत्रदानाची जनजागृती सुरु झाली. विडी कामगार, शेतकरी, मजूर, हमाल, महिला व गरिबांसाठी काहीतरी करणे, या सामाजिक बांधिलकीतून फिनिक्सने पुढाकार घेऊन ही चळवळ पुढे चालवली.
या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील विविध भागात दरमहा पाच नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन केले जाते. या शिबिराचा लाभ जिल्ह्यासह राज्यातील गरजू घटक याचा लाभ घेत आहे. आतापर्यंत 3 लाख 76 हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
नेत्रदानाच्या महत्वाची जाणीव करून देण्यासाठी बोरुडे यांनी दृष्टीमित्र, नेत्रज्योत व अंधारातून प्रकाशाकडे ही तीन प्रेरणादायी पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे प्रकाशन अण्णा हजारे व भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. या पुस्तकांमधून नेत्रदानासाठी समाजात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, हजारो नागरिकांनी नेत्रदानाचा संकल्प केला आहे. त्यांच्या कार्याला कुटुंबीयांचेही भरभरून पाठबळ लाभते आहे. घरच खाऊन दुसऱ्यांचे काम का करायचे? अशा टीकांनाही ते हसत उत्तर देतात, समाधान मिळतं ना, मग बस!
सामान्य व गरजू नागरिकांसाठी मोफत नेत्र उपचार व आधुनिक सेवा देणारे फिनिक्स नेत्रालय उभारण्यासाठी बोरुडे यांचे प्रयत्न सुरू आहेत. तपोवन रोडवर स्वतःच्या मालकीच्या जागेत हे रुग्णालय उभारले जाणार असून, त्याचा आराखडा तयार झाला आहे. लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभारण्यात येणार असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे.
फिनिक्सची जबाबदारी, दृष्टीहीनांना नवदृष्टी देण्याची!
जालिंदर बोरुडे यांनी उभी केलेली ही चळवळ केवळ एक वैद्यकीय उपक्रम नसून, ती एक सामाजिक क्रांती आहे. प्रत्येकाने नेत्रदानासाठी पुढाकार घेतल्यास, अंधत्वमुक्त समाजाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाईल. नेत्रदान हेच सर्वश्रेष्ठ दान या घोषवाक्याला कृतीची जोड देत फिनिक्स फाऊंडेशन समाजाला नवी दिशा देत आहे. वर्षभरात फिनिक्स नेत्रालय उभारण्याचा संकल्प असून, फिनिक्स नेत्रालयासाठी सर्वांनी हातभार लावण्याची गरज आहे. या नेत्रालयाच्या माध्यमातून गरजूंवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. -जालिंदर बोरुडे (संस्थापक अध्यक्ष, फिनिक्स सोशल फाऊंडेशन)