विविध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण; बचत गटातील महिलांचा गौरव
लोपपावत चाललेल्या लोककलेचे सादरीकरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडी येथील चार दिवसीय राज्यस्तरीय सहाव्या सावित्री ज्योती महोत्सवाचा समारोप महिलांच्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमाने झाला. यावेळी महोत्सवात घेण्यात आलेल्या हस्ताक्षर, निबंध, वक्तृत्व चित्रकला, नृत्य, मेहंदी, पाककला, ब्युटी टॅलेंट शो, उखाणे स्पर्धा, पथनाट्य आदी स्पर्धेतील विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. तर प्रदर्शनात सहभागी झालेल्या बचत गटातील महिलांचा देखील यावेळी गौरव करण्यात आला. तर लोपपावत चाललेल्या लोककलांनी सर्वांचे लक्ष वेधले.

कोहिनूर मंगल कार्यालयात जय युवा अकॅडमी, जिल्हा क्रीडा कार्यालय, नेहरु युवा केंद्र, महिला आर्थिक विकास महामंडळ, समाज कल्याण कार्यालय, महानगरपालिका आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून राष्ट्रीय युवा सप्ताहतंर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण व सावित्री ज्योती महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रम महिलांच्या हस्ते सावित्री मातेला हळदी-कुंकू वाहून करण्यात आले. माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी सावित्री ज्योती महोत्सवाचे मुख्य संयोजक ॲड. महेश शिंदे, पोपटराव बनकर, ॲड. अनिता दिघे, स्वागताध्यक्ष सुहासराव सोनवणे, सेवानिवृत्त प्राध्यापक तथा योग शिक्षक केवलकृष्ण कनोजिया, डॉ. धनाजी बनसोडे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी संजय गर्जे, जिल्हा महिला बाल कल्याण अधिकारी बी.व्ही. वारुडकर, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे, दिनेश शिंदे, सीए डॉ. शंकर अंदानी, स्वाती बनकर, जयश्री शिंदे, कल्याणी गाडळकर, कावेरी कैदके, शाहीर कान्हू सुंबे, अश्विनी वाघ, आरती शिंदे, तनीज शेख, विनोद साळवे, दर्शन बनकर, शामल कोचेवाड, डॉ. सरिता माने, रजनीताई ताठे आदींसह बचत गटाच्या महिला, स्पर्धक विद्यार्थी व युवक-युवती मोठ्या संंख्येने उपस्थित होत्या.

किशोर डागवाले म्हणाले की, या उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाची चळवळ यशस्वी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आर्थिक संपन्न झालेल्या महिलांच्या माध्यमातून कुटुंबाला आधार मिळून समाजाची प्रगती साधली जाणार आहे. तसेच विविध स्पर्धेद्वारे युवक-युवतींच्या कलागुणांना देखील वाव देण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
केवलकृष्ण कनोजिया म्हणाले की, सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली म्हणजे योग होय. विविध गंभीर आजारापासून व तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर नियमितपणे दररोज योगासने करणे गरजेचे आहे. प्राचीन काळापासून योगाभ्यास भारतात केला जातो. आजच्या पिढीने निरोगी जीवनासाठी योगाचा दैनंदिन जीवनात समावेश करण्याचे त्यांनी आवाहन केले.
हळदी कुंकू कार्यक्रमात महिलांच्या कविता व उखाणे रंगले होते. फुगडी खेळून व पारंपारिक गीत सादर करुन कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांना वाण म्हणून कापडी पिशव्या देण्यात आल्या. अहमदनगर शहर बार असोसिएशनचे नूतन पदाधिकारी ॲड. संजय सुंबे, ॲड. देवदत्त शहाणे, ॲड. शिवाजी शिंदे, ॲड. सारस क्षेत्रे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंत द्रविड व अनिल साळवे यांनी केले. स्वागताध्यक्ष सुहासराव सोनवणे यांनी आभार मानले. या महोत्सवाला नेहरु युवा केंद्राचे राज्य उपसंचालक शिवाजीराव खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, सहाय्यक समाज कल्याण आयुक्त राधाकिसन देवढे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. सिताराम जाधव, रमेश गाडगे, अशोक कासार, डॉ. संतोष गिऱ्हे, ॲड. विद्या शिंदे, विनायक नेवसे, शेखर होले, गणेश बनकर, रावसाहेब मगर, निकिता वाघचौरे, स्वाती डोमकावळे, कांचन लद्दे, मीना म्हसे, नयना बनकर, रोहिणी थोरात, दिलीप घुले, जय शिंदे आदींनी परिश्रम घेतले.