• Tue. Dec 30th, 2025

रस्त्याची अक्षरशः बनली चाळण; सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी वेधले सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष

ByMirror

Dec 8, 2025

अरणगाव ते बाबुर्डी घुमट रस्त्याची दुरावस्था

डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करावे -विजय भालसिंग

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथून वाळकी मार्गे श्रीगोंदाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय बनली असून, रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या मार्गावर खोल खड्डे, खचलेली डांबरी पृष्ठभाग, रात्रीच्या वेळी प्रकाशयोजनेचा अभाव यामुळे अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. या गंभीर परिस्थितीत सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधून तातडीने रस्त्याच्या डांबरीकरणाची मागणी केली आहे.


तर या खड्डेमय रस्त्यावर सामाजिक कार्यकर्ते भालसिंग यांना देखील घसरुन पडल्याची वेळ आली. बाबुर्डी घुमट ते अरणगाव या 3 ते 4 किलोमीटर पर्यंत रस्त्याची विशेषतः मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी खोल आणि रूंद खड्डे पडले असून “रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता?” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या खड्ड्यांतून वाहन चालवताना अनेक वाहन चालक पडून जखमी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, नागरिकांना पाठदुखी, मणक्याचे दुखणे अशा शारीरिक समस्या उद्भवू लागल्या आहेत.


रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्री वाहनधारकांना खड्डे दिसत नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण आणखी वाढत आहे. एकदा का वाहन खड्ड्यात उतरल्यानंतर समतोल राखणे कठीण होत आहे. या रस्त्यावर दिवसाढवळ्या देखील वाहन घसरून जाण्याच्या घटना घडत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याला वाळकीसह अनेक गावे जोडलेली असल्याने मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ, महिला वर्ग, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची वर्दळ असते. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देऊन तातडीने रस्ता डांबरीकरणाची मागणी करण्यात आली आहे.


पावसाळ्यानंतर हा रस्ता अक्षरशः वाहून गेला आहे. दररोज अपघात होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ डागडुजी न करता संपूर्ण रस्त्यावर भर टाकून उच्च दर्जाचे डांबरीकरण करावे. त्यामुळे पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी व महिला वर्गाचा मोठा प्रश्‍न मार्गी लागेल. -विजय भालसिंग (सामाजिक कार्यकर्ते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *