• Wed. Dec 31st, 2025

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या उच्च माध्यमिक विभागाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Dec 21, 2025

जीवनात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अभ्यास व खेळ यांची सांगड आवश्‍यक -आनंद भंडारी


कोळीगीत, स्त्री शक्ती व ऑपरेशन सिंदूरने जिंकली मने

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये उच्च माध्यमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विविध सांस्कृतिक व देशभक्तीवर रंगलेल्या कार्यक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले. कोळीगीत, स्त्री शक्ती व ऑपरेशन सिंदूरने कार्यक्रमाची रंगत वाढवली.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी डॉ. स्मिता भंडारी यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त ॲड. गौरव मिरीकर, सल्लागार मंडळाच्या सदस्या आशाताई फिरोदिया, भूषण भंडारी, पुष्पाताई फिरोदिया, सुनिता मुथा, विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, उपप्राचार्य कैलास साबळे, पर्यवेक्षक बाळासाहेब वाव्हळ, वैभव कुलकर्णी, विद्यार्थी प्रतिनिधी ओम मिसाळ, नक्षत्रा इप्पलपेल्ली आदींसह शिक्षक, शिक्षकेतर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया यांनी आधुनिक काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचा भाग बनत चालला असल्याचे स्पष्ट करुन त्याचा वापर फक्त विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी व शिक्षकांनी अध्यापनासाठी करण्याचे आवाहन केले. प्रारंभी पाहुण्यांचे ढोल पथकाच्या गजरात स्वागत करुन विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले.
आनंद भंडारी म्हणाले की, विद्यार्थ्यांनी भरपूर वाचन करावे. वाचनातून समृध्द व्यक्ती घडतो. वाचनामध्ये दर्जेदार साहित्याला महत्त्वाचे स्थान द्यावे. वाचनामध्ये दर्जेदार साहित्य असेल तर आपल्या विचारसरणीमध्ये निश्‍चितच सकारात्मक विचार रुजू होतात. वाचनाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळाची ही सांगड योग्य पद्धतीने घालण्याचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.


डॉ. स्मिता भंडारी यांनी आपल्या भाषणातून शाळेच्या जुन्या आठवणी विद्यार्थ्यांपुढे मांडल्या. ते म्हणाल्या की, आपल्या अध्यापकांनी दिलेली शाबासकीची थाप ही जीवनात अतिशय मोलाची ठरते. कारण या शाबासकीची थाप मिळाल्यावर आपल्याला आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळांतर्गत विविध परीक्षां व स्पर्धापरीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्राचार्य उल्हास दुगड यांनी करून दिला. सांस्कृतिक कार्यक्रमात झांज-ढोल पथक, शारीरिक शिक्षण व मानवी मनोरेच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाचा उत्साह वाढवला. नवदुर्गा, दुर्गा पूजा, रिमिक्स, छावा, आनंद हरपला, खरी गुंतवणूक या सारख्या विविध हिंदी-मराठी गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रमाचे बहारदार सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले. उपस्थित प्रेक्षक व पालकांनी त्यांना टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक अमेय कानडे व अंजली गोले यांनी केले. तर विविध गुणदर्शन व शारीरिक शिक्षणाची प्रात्यक्षिके यांचे सूत्रसंचालन शालेय विद्यार्थी कु. गुंजन गोले, प्रणिती ठाणगे व प्रथमेश बेरड यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी राजकुमार बनसोडे यांनी मानले. पारितोषिक वितरणासाठी दिपाली काळे व दिपेश ओस्तवाल यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाची सांगता परशुराम मुळे यांनी वंदे मातरम या गीताने झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *