शेतकऱ्यांच्या वेदना विसरू नका
न्यायाधीश आणि वकिलांच्या दिवाळी फराळात सामाजिक संदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दरवर्षी आपण दिवाळी साजरी करतो, पण खऱ्या अर्थाने दिवाळी तेव्हाच उजळते जेव्हा समाजातील शेवटच्या घटकांनाही त्या प्रकाशाचा आनंद घेता येतो. यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण आपला आनंद साजरा करत असताना त्यांचाही सण गोड व्हावा, यासाठी प्रत्येकाने काहीतरी हातभार लावला पाहिजे, असा हृदयस्पर्शी संदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे यांनी दिला.
अहमदनगर बार असोसिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात न्यायाधीश व वकीलांसाठी आयोजित दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्रधान जिल्हा न्यायाधीश अंजू शेंडे बोलत होत्या. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश पाटील, सरकारी वकील सतीश पाटील, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे, उपाध्यक्ष ॲड. वैभव आघाव, सचिव ॲड. संदिप बुरके, विशेष सरकारी वकील ॲड सुरेश लगड, ॲड. अनुराधा येवले, कार्यकारिणी सदस्य ॲड. रामेश्वर कराळे, ॲड. अभिजीत देशमुख, ॲड. संजय पाटील, सरकारी वकील ॲड. जी.के. मुसळे, ॲड. रविंद्र शितोळे, ॲड. गौरव दांगट, ॲड. राजेश कावरे, ॲड. राजाभाऊ शिर्के, ॲड. रमेश कराळे, ॲड. अजिंक्य काळे, ॲड. अनिता दिघे, ॲड. स्वाती जाधव, ॲड. बी.ए. देशमुख, ॲड. आनंद सुर्यवंशी, ॲड. ॲड. प्रज्ञा ऊजागरे, ॲड. पिंटू पाटोळे, ॲड. स्नेहा लोखंडे, ॲड. ज्योत्सना ससाणे आदी उपस्थित होते.
न्यायाधीश अंजू शेंडे पुढे म्हणाल्या की, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी न्यायाधीशांनी एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. समाजातील सर्व घटकांनी आपल्या परीने मदतीचा हात पुढे करावा. याप्रसंगी त्यांनी समाजजागृतीपर ऊन सावळी येतील… लावू चार दिवे लावू… जिथे माहित नाही दिवाळी तेथे लावू चौथा दिवा… ही भावपूर्ण कविता सादर केली.
प्रास्ताविकात बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे यांनी सांगितले की, दरवर्षी बेंच आणि बार यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले जाते. न्यायव्यवस्था गतीमान ठेवण्यासाठी दोन्ही घटक एकमेकांवर अवलंबून आहेत. अशा खेळीमेळीच्या वातावरणात विचारांची देवाणघेवाण होऊन आपुलकी वृद्धिंगत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव आघाव यांनी केले, तर आभार प्रदर्शन संदिप बुरके यांनी मानले. या आनंदोत्सवात उपस्थित सर्वांनी एकमेकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
