फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
14 वर्ष वयोगटात तक्षिला स्कूल, आर्मी पब्लिक स्कूलची दमदार खेळी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत बुधवारी (दि.3 सप्टेंबर) आठरे पाटील स्कूलच्या मुलांच्या विविध गटासह मुलींच्या संघाने मैदान गाजवले. प्रतिस्पर्धी संघाला कडवी झुंज देऊन तर एकहाती विजय संपादन करुन उत्कृष्ट खेळाची छाप सोडली. तसेच 14 वर्ष वयोगटात तक्षिला स्कूल, आर्मी पब्लिक स्कूलने देखील दमदार खेळ करुन विजय मिळवला.
सकाळच्या सत्रात 14 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूल विरुध्द ऑक्झिलियम कॉन्व्हेंट यांच्यात सामना रंगला होता. यामध्ये चिरायू लोढा याने 3 गोल करुन तक्षिला स्कूलला 3-0 गोलने विजय मिळवून दिला.
आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द कर्नल परब स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात आर्मी पब्लिक स्कूलने 5-0 गोलने एकहाती विजय मिळवला. यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. आर्मी पब्लिक स्कूलचे प्रथमेश लहाडे याने 3 व आशिष शेळके याने 2 गोल केले.
12 वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील विरुध्द कर्नल परब यांच्यात झालेल्या सामन्यात मागील वर्षीचा उपविजेता असलेल्या आठरे पाटील स्कूल संघाने 8-0 गोलने सहज विजय मिळवला. आठरे पाटील स्कूलने आक्रमक खेळी करुन एकामागोमाग 8 गोल केले. तर प्रतिस्पर्धी संघाला आपले खाते देखील उघडता आले नाही. आठरे पाटील कडून सात्विक कर्पे, वेदांत ससे व मोहित कोळेकर यांनी प्रत्येकी 2 गोल केले. तर भावेश नेरे व विश्वजीत आकाडे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
दुपारच्या सत्रात 17 वर्षा आतील मुलींच्या सामन्यातही आठरे पाटील स्कूलने कर्नल परब संघावर 8 गोल करुन एकहाती विजय संपादन केले. आक्रमक खेळीने 8-0 गोल करुन प्रतिस्पर्धी संघाला 0 गोलवर रोखून धरले होते. यामध्ये स्वरांजली शेळके हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन 4 गोल केले. निलम पवार व इरम कुद्दुस यांनी प्रत्येकी 1 तर वेदिका ससे हिने 2 गोल केले.
16 वर्ष वयोगटात (मुले) तक्षिला स्कूल विरुध्द ऑर्चिड स्कूलमध्ये सामना रंगला होता. हा सामना शेवट पर्यंत 0-0 गोलने अनिर्णित राहिला.
14 वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील स्कूल विरुध्द ऑर्चिड स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात साई खतोडे याने 2 गोल करुन आठरे पाटील स्कूलला 2-0 गोलने विजय मिळवून दिला.