• Wed. Dec 31st, 2025

भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Dec 24, 2025

विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणातून अखंड भारताचे दर्शन


स्पर्धेला न घाबरता आत्मविश्‍वासाने पुढे जा -पल्लवी विजयवंशी (छावणी परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी)

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भुईकोट किल्ला परिसरातील पंडित नेहरू हिंदी विद्यालय तथा प्राथमिक पाठशाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील विविधतेतून अखंड भारताचे सुंदर दर्शन घडविले. हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरले.


कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या पारंपरिक लेझिम पथकाच्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर स्वागतगीत व विविध नृत्यप्रकारांनी संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला. विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थित प्रेक्षक व पालकांची मने जिंकली.


स्नेहसंमेलनाचे उद्घाटन छावणी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय संस्थेचे सचिव किशोर मुनोत, संचालक धनेश गांधी, मुख्याध्यापक सुहास धीवर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका अंजली स्वामी यांची उपस्थिती होती.


प्रास्ताविक कमल भोसले यांनी केले. मुख्याध्यापक सुहास धीवर यांनी कला, क्रीडा व शिक्षण क्षेत्रातील शाळेच्या उल्लेखनीय यशाचा आढावा सादर केला. धीवर म्हणाले की, जिल्ह्यातील एकमेव हिंदी माध्यमाची शाळा असलेल्या या विद्यालयात विविध सामाजिक घटकांतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी शाळेच्या वतीने शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. डिजीटल शिक्षण व आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शाळा प्रयत्नशील असल्याची माहिती त्यांनी दिली.


मुख्य कार्यकारी अधिकारी पल्लवी विजयवंशी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या युगात जीवनातील प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला न घाबरता आत्मविश्‍वासाने स्पर्धेत उतरावे. यश-अपयशाला फारसे महत्त्व न देता स्वतःची गुणवत्ता सिद्ध करणे अधिक महत्त्वाचे आहे. शिस्त, जिद्द व ध्येय स्पष्ट ठेवून वाटचाल केल्यास निश्‍चितच यश मिळते, असे त्यांनी नमूद केले.


संस्थेचे सचिव किशोर मुनोत यांनी आपल्या भाषणात सांगितले की, मनाचा निश्‍चय पक्का असेल तर जीवनात कोणतेही ध्येय साध्य करता येते. पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले तर त्यांच्या अडचणी समजून घेणे सोपे होते. पालकांनी मुलांना वेळ दिल्यास ते आपोआप मोबाईलपासून दूर राहतील. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास जितका महत्त्वाचा आहे, तितकाच शारीरिक विकासही गरजेचा आहे. फास्टफूडमुळे आरोग्याच्या समस्या वाढत असल्याने पालकांनी मुलांच्या आहारासह मैदानी खेळांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले.


यावेळी शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये शाळांतर्गत विविध परीक्षांमध्ये व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी हिंदी व मराठी गीतांवर आधारित नृत्य, देशभक्तीपर नृत्य, पारंपरिक गीत, रिमिक्स व रॅप अशा विविध प्रकारांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित प्रेक्षक व पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात भरभरून दाद दिली.


स्नेहसंमेलन यशस्वी करण्यासाठी शालेय शिक्षक तसेच माध्यमिक शिक्षक सोसायटीचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब बोडखे, परीक्षित सुने, ठाकूर परदेशी, गोपीचंद परदेशी, नुतन आदक, कविता जोशी, कमल भोसले, सुदेश छजलानी, मोनिका मेहतानी, वैभव शिंदे, शिल्पा पाटोळे, शिक्षकेतर कर्मचारी योगेश गायकवाड आदींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता शर्मा यांनी केले, तर आभार बाबासाहेब बोडखे मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *