16 वर्ष वयोगटात आठरे पाटील पब्लिक स्कूलची अंतिम फेरीत धडक
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेचे अंतिम सामने पुढील आठवड्यात अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर रंगणार आहेत. शनिवारी (दि.27 सप्टेंबर) सकाळी 16 वर्ष वयोगटात (मुले) झालेल्या उपांत्य फेरीत आठरे पाटील पब्लिक स्कूलने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे.
या स्पर्धेत अंतिम सामने 12 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल, 14 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द तक्षिला स्कूल, 16 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी पब्लिक स्कूल विरुध्द आठरे पाटील स्कूल आणि 17 वर्षा खालील मुलींच्या गटात प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द श्री साई इंग्लिश मिडीयम स्कूल यांच्यात होणार आहे. तसेच तिसऱ्या स्थानासाठी 14 व 16 वर्ष वयोगटात (मुले) प्रवरा पब्लिक स्कूल विरुध्द विरुध्द सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट स्कूलचे सामने रंगणार आहे.
शनिवारी झालेल्या 16 वर्ष वयोगटात (मुले) आठरे पाटील पब्लिक स्कूल विरुध्द सेक्रेटहार्ड कॉन्व्हेंट स्कूल यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पार पडला. अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात भानुदास चंद याने 28 व्या मिनीटाला 1 गोल करुन आठरे पाटील संघाचा विजय निश्चित केला. तर प्रतिस्पर्धी संघाला शेवट पर्यंत रोखून धरले, त्यांना एकही गोल करु दिला नाही. 1-0 गोलने आठरे पाटील पब्लिक स्कूलने विजय मिळवून अंतिम फेरी गाठली आहे.