फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धा
शनिवारच्या सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट संघ विजयी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स इंटर स्कूल फुटबॉल स्पर्धेत शनिवारी (दि.13 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट स्कूलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन कैसर एज्युकेशन फाऊंडेशन स्कूलवर एकहाती विजय मिळवला. तर पीएम श्री केंद्रीय विद्यालय विरुध्द कर्नल परब स्कूल यांच्यात अटीतटीचा सामना बरोबरीत सुटला.
सकाळच्या सत्रात 14 वर्ष वयोगटात (मुले) आर्मी सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंट विरुध्द कैसर एज्युकेशन फाऊंडेशन स्कूलमध्ये झालेल्या सामन्यात सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटने उत्कृष्ट खेळी करुन तब्बल 6 गोल केले. प्रतिस्पर्धी संघाला एकही गोल करता आला नाही. या सामन्यात हर्षद सोनवणे यांनी लागोपाठ 5 गोल करुन उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. वेदांत देवकर याने 1 गोल केला. 6-0 गोलने सेक्रेडहार्ट कॉन्व्हेंटचा संघ विजयी ठरला.
पीएम श्री केंद्रीय विद्यालय विरुध्द कर्नल परब स्कूल यांच्यात अटीतटीचा सामना रंगला होता. पीएम श्री केंद्रीय विद्यालयाकडून अफान शेख व कर्नल परब स्कूलकडून अथर्व तोडमल यांनी प्रत्येकी 1 गोल करुन बरोबरी साधली. मात्र शेवटच्या क्षणा पर्यंत दोन्ही संघांनी बरोबरी साधली. हा सामना 1-1 गोलने बरोबरीत सुटला.
सोमवार (दि.15 सप्टेंबर) पासून अहमदनगर महाविद्यालयाच्या मैदानावर उपांत्यपूर्व व उपांत्य फुटबॉल सामन्यांचा थरार रंगणार आहे. 14 व 16 वर्ष (मुले) वयोगटातील उपांत्यपूर्व फेरीचे सामने होणार आहे. यामध्ये प्रत्येकी 8 संघाचा सहभाग आहे. तसेच 12 वर्ष वयोगटात (मुले) व 17 वर्षा खालील मुलींच्या गटातील उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. हे सामने नॉक आऊट पध्दतीने खेळविले जाणार असून, तुल्यबळ संघ भिडणार आहेत.
