गुरु-शिष्यांची रंगली फुगडी
निराधार, अनाथांच्या दिंडीतील सेवाकार्यातून घडतेय पांडूरंगाचे दर्शन -विजय भालसिंग
नगर (प्रतिनिधी)- जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी व वृध्दाश्रमाची आषाढी एकादशी निमित्त पंढरीच्या दर्शनासाठी निघालेल्या दिंडीचे भिंगारमध्ये सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग व देवदत्त शेंडे यांनी भक्तीमय वातावरणात स्वागत केले. लासलगाव (जि. नाशिक) येथून निघालेल्या या दिंडीत आश्रमातील अनाथ मुले व वृध्दाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसह वारकरी सहभागी झालेले आहेत.
जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी, वृध्दाश्रमाची पायी दिंडी सोहळा मजल दरमजल करत पंढरीकडे चालला आहे. गावोगावी या दिंडी सोहळ्याचे स्वागत होत आहे. दिंडीच्या माध्यमातून दीन-दुबळ्यांची सुरू असलेली सेवा प्रेरणादायी आहे. माणुसकीच्या भावनेने सुरु असलेले सेवा कार्य पाहून या दिंडीत साक्षात पंढरीच्या पांडूरंगाचे दर्शन घडत असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी केले.
अनाथ व वृध्दाश्रमचे संस्थापक असलेले तपस्वी स्वामी वासुदेव नंदगिरी महाराज यांचे पूजन करून दिंडी प्रमुख, विणेकरी व चोपदार यांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी दिंडी चालक तथा आश्रमचे सचिव दिलीप गुंजाळ, देवदत्त शेंडे आदींसह वारकरी व भिंगार येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथे तपस्वी स्वामी वासुदेवनंदगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली जय जनार्दन स्वामी अनाथ विद्यार्थी आश्रम व वृध्दाश्रम चालवला जात आहे. दरवर्षी अनाथ मुले व ज्येष्ठ नागरिकांसह आषाढीच्या वारीसाठी दिंडी काढण्यात येत असल्याची माहिती दिलीप महाराज गुंजाळ यांनी दिली. यावेळी स्वामी वासुदेवनंदगिरी महाराज स्वामी म्हणाले, जगात माणुसकी हा सर्वांत मोठा धर्म असून, वंचित, अनाथांसाठी आश्रमाचे दारे सदैव उघडे आहेत.
अनेक अनाथ बालकांना आधार देऊन त्यांना घडविण्यासह त्यांचे लग्न लावण्यापर्यंत कार्य सुरू असल्याची माहिती दिली.
दिंडीतील वारकऱ्यांचे भिंगारकरांनी उत्साहात स्वागत केले. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांमध्ये रंगलेल्या फुगड्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. सामाजिक कार्यकर्ते तथा वृक्षमित्र विजय भालसिंग यांनी गुरू स्वामी वासुदेवनंदगिरी उर्फ बहुरूपी महाराज यांच्यासह फुगडीचा फेर धरला होता. गुरु-शिष्याच्या जोडीच्या फुगडीला उपस्थित भाविकांनी दाद दिली. दिंडीतील वारकऱ्यांसाठी देवदत्त शेंडे यांच्याकडून उपवासाचे जेवण देण्यात आले. तर सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांच्या वतीने फळांचे वाटप करण्यात आले.