गुरु गोविंदसिंहजी यांच्या त्याग, शौर्य, समता व मानवतेच्या शिकवणीचा संदेश
रमेश खुराणा व जगदीश बजाज यांना गुरु नानक देवजी सेवा पुरस्कार प्रदान
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तारकपूर येथील गुरुद्वारा कुंदनलालजी येथे शीख धर्माचे दहावे गुरु श्री गुरु गोविंदसिंहजी यांची 359 वी जयंती (प्रकाश गुरुपूरब) मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यानिमित्त गुरुद्वारामध्ये दिवसभर धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’ या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात दुमदुमून गेला.

या सोहळ्यानिमित्त गुरुद्वारामध्ये कीर्तन, कथेचा कार्यक्रम, गुरुबाणीचे पठण व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. शीख समाजासह शहरातील विविध समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व लंगरचा लाभ घेतला. धार्मिक कार्यक्रमांमधून गुरु गोविंदसिंहजी यांच्या त्याग, शौर्य, समता व मानवतेच्या शिकवणीवर प्रकाश टाकण्यात आला.
दरवर्षी देण्यात येणारा प्रतिष्ठेचा गुरु नानक देवजी सेवा पुरस्कार रमेश खुराणा व जगदीश बजाज यांना यंदा गुणे आयुर्वेद महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संजय आहुजा, राजेंद्र कंत्रोड, जसपाल कुमार, अनिश आहुजा, जितू गंभीर, ब्रिजमोहन कंत्रोड, बबलू आहुजा, निपू धुपद, ॲड. काकडे, करण आहुजा, अमन खुराणा, गुलशन कंत्रोड, काकू बाबाजी, विनायक कुलते, सचिन फुलारे, मोहिते पंजाबी, जय रंगलानी, गिरीश नवलनी, किशोर कंत्रोड आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सचिन जगताप म्हणाले की, “शीख व पंजाबी समाजाने धर्म, समाज व देशासाठी दिलेले बलिदान सर्वोच्च आहे. गुरु गोविंदसिंहजी यांनी सत्य, धैर्य, समानता व मानवतेचा संदेश दिला. आजही हा समाज त्या मूल्यांची जपणूक करत माणुसकीची वाटचाल करीत आहे. सर्व समाजांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घेण्याची गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास धनंजय जाधव, जय भोसले व इंजि. केतन क्षीरसागर यांनी भेट देऊन समाजबांधवांना गुरु गोविंदसिंहजी जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. गुरुद्वारामध्ये गुरु नानक देवजी (जी.एन.डी.) ग्रुप, वाहे गुरु सेवा ग्रुप, एस.पी. सेवा ग्रुप यांच्या वतीने लंगरचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी मोहित पंजाबी यांचे देखील सहकार्य लाभले. यावेळी लंगरचा भाविकांनी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गुरुद्वारा समिती व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.
