सेवापूर्ती सोहळ्यात शिक्षकांच्या कार्याला सलाम
‘गुणवत्तापूर्ण शिक्षणातून समाज घडविण्याचे कार्य रयत करत आहे’ -दादाभाऊ कळमकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- रयत शिक्षण संस्थेच्या केडगाव येथील श्री अंबिका प्राथमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयात उपशिक्षिका अरुणा तुकाराम दरेकर आणि उपशिक्षक विलास जगन्नाथ भोंदे यांच्या सेवापूर्तीनिमित्त गौरव करण्यात आला. अनेक वर्षे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणाऱ्या या दोन्ही शिक्षकांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि संस्कारक्षम कार्याचा यावेळी मान्यवरांनी गौरव करत त्यांच्या समर्पित सेवेचे कौतुक केले.
रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर, अंबादास गारुडकर, विठ्ठलराव दरेकर, ज्ञानदेव पांडुळे, कुंडलिकराव दरेकर, अर्जुन पोकळे, अशोकराव बाबर, अनिल साळुंखे, शौकतबाई तांबोळी, अलकाताई अनभुले, किसन सातपुते, महेश गुंड, भास्करराव महाडिक, पोपट शिंगवी, प्रशांत कोतकर, गोविंद कोतकर, गंगाधर लोंढे, कृष्णाजी थोरात, रावसाहेब सातपुते, रामदास येवले, रघुनाथराव लोंढे, मधुकर देशपांडे, अभयकुमार चव्हाण यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यालय, नातेवाईक, सहकारी शिक्षक आणि मान्यवरांच्या हस्ते अरुणा दरेकर व विलास भोंदे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या प्रदीर्घ सेवेला दाद दिली.
प्रास्ताविकात प्राचार्य नवनाथ बोडखे यांनी दोन्ही शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, शिक्षक हा समाज घडविणारा शिल्पकार असतो. अरुणा दरेकर आणि विलास भोंदे यांनी आपल्या सेवाकाळात निष्ठा, प्रामाणिकपणा आणि विद्यार्थ्यांप्रती असलेल्या समर्पणातून अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले. त्यांचा हा गौरव म्हणजे संपूर्ण शिक्षक समाजाचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.
बाबासाहेब भोस यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, रयतमधील शिक्षकांनी समाजाभिमुख शिक्षणाची परंपरा जोपासली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच संस्थेच्या विकासासाठीही रयत सेवकांनी योगदान दिले आहे. सेवकांच्या पगारातील एक टक्का निधीतून उभारण्यात आलेल्या शैक्षणिक संकुलांच्या इमारती ही संस्थेच्या सामूहिक कार्यसंस्कृतीची साक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात दादाभाऊ कळमकर म्हणाले की, रयत शिक्षण संस्था ही केवळ शैक्षणिक संस्था नसून समाज परिवर्तनाची चळवळ आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांवर आधारित शिक्षणपद्धतीमुळे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळाली. आज संस्थेने भौतिक सुविधांसोबतच गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय प्रगती केली असून, त्यामागे शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यानी स्पष्ट केले.
रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, गुणवत्ताधारक शिक्षकांच्या मेहनतीतूनच देशाची भावी पिढी घडते. शिक्षक निवृत्त होतो, मात्र त्याने दिलेले संस्कार आणि घडविलेले विद्यार्थी समाजात कायम कार्यरत राहतात. त्यामुळे अशा समर्पित शिक्षकांचा निरोप हा भावनिक क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना अरुणा दरेकर यांनी वाळकी आणि केडगाव येथील अंबिका विद्यालयातील आपल्या सेवाकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थ्यांचे प्रेम, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि संस्थेने दिलेली कार्यसंस्कृती ही आयुष्यभर जपण्यासारखी असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या. विलास जगन्नाथ भोंदे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्य आहे. शिक्षणाची आवड आणि विद्यार्थ्यांना घडविण्याची प्रेरणा यामुळे सेवाकाळ कधी संपला हे समजलेच नाही. आज अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात यशस्वी झालेले पाहून समाधान वाटते, असे सांगताना ते भावूक झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री भोस आणि स्वाती औटी यांनी केले, तर उपमुख्याध्यापक सुखदेव मुरूमकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिताराम जपकर, संदीप गाडीलकर, अंबादास पारधे, प्रशांत शेळके, स्वाती चोभे, प्राजक्ता दामगुडे आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

