• Thu. Sep 10th, 2026

Mirrornews24

Marathi News

शिक्षक भावी पिढीला दिशा देणारे दीपस्तंभ -ज्ञानदेव लंके गुरुजी

ByMirror

Sep 10, 2026
पोवाडे व कवितांनी वेधले रसिकांचे लक्ष

निमगाव वाघा येथे आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहात; गुणवंत शिक्षकांसह कर्तृत्ववानांचा सन्मान


पोवाडे व कवितांनी वेधले रसिकांचे लक्ष


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शिक्षक हे भावी पिढीला मार्ग दाखविणारे आणि विद्यार्थ्यांच्या मनात विचारांची पेरणी करणारे दीपस्तंभ आहेत. आजच्या बदलत्या काळातही शिक्षकांना समाजात सन्मानाचे स्थान असून, त्यांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून कार्य करण्याची गरज आहे. साहित्य हे समाजाला दिशा देणारे प्रभावी माध्यम असून, ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्‍न, समस्या, संस्कृती आणि जीवनाचे वास्तव प्रभावीपणे प्रतिबिंबित होत असल्याचे प्रतिपादन ज्ञानदेव लंके गुरुजी यांनी केले.


निमगाव वाघा (ता. नगर) येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवारी (दि. 10 सप्टेंबर) आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्यिक सीए डॉ. प्रकाश अंदानी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. यावेळी स्वागताध्यक्षा साहित्यिक हेमलता गिते, संमेलनाचे मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे, कवी रुपचंद शिदोरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, उद्योजक दिलावर शेख, सोसायटीचे चेअरमन अतुल फलके, मुख्याध्यापक चांद हुसेन शेख, गोकुळ जाधव, भागचंद जाधव, लक्ष्मण चौरे, डॉ. विजय जाधव, भाऊसाहेब जाधव यांच्यासह साहित्यिक, कवी, शाहीर आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांनी संमेलनास भेट देऊन शिक्षक आणि साहित्यिकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, बदलत्या काळात वाचन संस्कृती संपलेली नसून तिचे स्वरूप बदलले आहे. डिजिटल युगात मोबाईल, ई-पुस्तके, विविध डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणावर वाचन केले जात आहे. साहित्य आणि काव्य ही केवळ मनोरंजनाची साधने नसून समाजाला दिशा देणारे विचार आहेत. त्यामुळे नव्या पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी साहित्यिक आणि शिक्षकांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


सीए प्रा. डॉ. शंकर अंदानी म्हणाले की, साहित्य हे समाजाचा आरसा आहे. समाजातील वेदना, आनंद, संघर्ष, परिवर्तन, संस्कार आणि माणुसकीचे प्रतिबिंब साहित्यामध्ये उमटत असते. ग्रामीण भागातील साहित्यिकांनी आपल्या मातीतले प्रश्‍न, स्थानिक संस्कृती, निसर्ग, परंपरा आणि माणुसकी यांचे प्रभावी चित्रण केले आहे. त्यामुळे ग्रामीण साहित्य अधिक वास्तववादी आणि समाजाच्या जवळ जाणारे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


संमेलनात नेवासा येथील प्रसिद्ध शिवशाहीर सुनील चिंचोलीकर यांच्या पोवाड्याचा विशेष कार्यक्रम झाला. प्रभावी आवाज, जोशपूर्ण सादरीकरण आणि सामाजिक संदेश यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या पोवाड्यासह छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित पोवाड्यांनी उपस्थितांची दाद मिळविली.


प्रास्ताविकात संमेलनाचे मुख्य संयोजक पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची भूमिका स्पष्ट केली. ग्रामीण भागातील साहित्यिक, कवी आणि कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच ग्रामीण प्रश्‍नांवर समाजाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम या संमेलनातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील समस्या, लोकजीवन आणि सामाजिक वास्तव साहित्याच्या माध्यमातून मांडले जाते. त्यातून प्रश्‍नांना उजाळा मिळण्याबरोबरच नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.


ज्ञानदेव लंके गुरुजी यांच्या हस्ते गुणवंत शिक्षक तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भाग्यलता जाधव, स्वप्निल काळे, शिवशाहीर सुनील चिंचोलीकर, प्रिती पवार, दिनकर दावभट, अशोक सूर्यवंशी, सुरेश चव्हाण, राजेंद्र नष्टे, राजेंद्र भोस, बाळासाहेब देशमुख, अभिजीत पाचारणे, संगिता घोडके आणि अशोक भालके यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक चाँद हुसेन शेख यांनी केले. आभार संदिप डोंगरे यांनी मानले.



काव्यसंमेलनातून ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब
संमेलनातील काव्य मैफलीत ग्रामीण जीवन, शिक्षकांचे योगदान आणि विविध सामाजिक विषयांवर आधारित कवितांचे सादरीकरण करण्यात आले. श्रेयस लहामगे, पूनम भुतारे, चाँद शेख, गोविंद पाठक, दत्तात्रय फलके, अशोक मोहिते आणि मच्छिंद्र नवघरे यांनी आपल्या कविता सादर केल्या. ग्रामीण जीवनातील सुख-दुःख, संघर्ष, सामाजिक वास्तव आणि शिक्षकांच्या जीवनाशी निगडित विषय कवितांमधून प्रभावीपणे मांडण्यात आले. बाळासाहेब देशमुख यांच्या कथाकथनाच्या कार्यक्रमालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *