वंचित व निराधार बालकांना फराळचे वाटप
आनंद वाटला की, दिवाळी उजळते -मायाताई कोल्हे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- यशवंती मराठा महिला मंडळाच्या वतीने बालघर प्रकल्पातील वंचित व निराधार बालकांना फराळचे वाटप करुन त्यांची दिवाळी गोड करण्यात आली. समाजातील वंचित, निराधार व प्रेमासाठी आसुसलेल्या बालकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.
या वेळी महिला मंडळाच्या सदस्यांनी बालकांसह विविध बौद्धिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक खेळांमध्ये सहभाग घेतला. खेळामधील विजेत्या मुलांना बक्षीस देऊन प्रोत्साहित करण्यात आले. या प्रसंगी संस्थापक अध्यक्षा मायाताई कोल्हे, जिल्हाध्यक्ष गीतांजली काळे, शहराध्यक्ष मीरा बारस्कर, शहर ग्रामीण अध्यक्ष रूपाली ताकटे, उपाध्यक्ष कविता दरंदले, सचिव लीना नेटके, माजी जिल्हाध्यक्ष शर्मिला कदम, उर्मिला वाळके, माजी शहराध्यक्षा आशाताई शिंदे, आरती थोरात, अर्चना बोरुडे, नंदा मुळे, लता भापकर, मेघा झावरे, मंगल शिरसाठ, मंगल शिर्के, सारिका तट, सुलक्षणा अडोळे, माजी नगरसेविका दिपाली बारस्कर, ज्योती गंधाडे, सोहनी पूर्नाळे, सुरेखा खैरे, राजश्री शेळके, प्रमिलाताई सुंबे, राजश्री सालके आदींसह महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बालघर प्रकल्प व शांताई वृद्धाश्रमाचे संचालक युवराज गुंड यांना कर्म तपस्वी पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. वंचित बालकांबरोबर दिवाळी साजरी करून समाजात संवेदनशीलतेचा, प्रेमाचा आणि एकात्मतेचा संदेश देण्यात आला.
मायाताई कोल्हे म्हणाल्या की, दिवाळी म्हणजे फक्त दिवे, फराळ आणि आनंद नव्हे; ती म्हणजे आनंद वाटण्याचा सण. समाजात अजूनही अनेक मुले प्रेमाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलवणे, हेच खरी दिवाळी सणाचा आनंद आहे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार समाजातील वंचित घटकांच्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.
गीतांजली काळे म्हणाल्या की, यशवंती मराठा महिला मंडळ केवळ महिलांच्या सक्षमीकरणापुरते मर्यादित नाही, तर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे. या मुलांच्या निरागस हसण्यातून सर्वांना खरी दिवाळी अनुभवायला मिळाली. आम्ही केवळ फराळ वाटला नाही, तर प्रेम, आत्मीयता वाटल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मीरा बारस्कर यांनी सांगितले की, वंचित बालकांसह साजरी केलेली दिवाळी प्रत्येकाच्या मनात कायमची कोरली जाणार आहे. दिवाळी केवळ घरात नाही, मनात उजळायला हवी. आपल्या थोड्याशा प्रयत्नाने एखाद्याचे आयुष्य उजळू शकते. यशवंती मराठा महिला मंडळ समाजसेवेच्या माध्यमातून ही दिवाळी दरवर्षी साजरी करत असल्याचे त्या म्हणाल्या.