ऐश्वर्या चौरसिया, समीक्षा पवार, अक्षदा बेलेकर, अपूर्वा आवारी यांची राज्य स्पर्धेसाठी निवड
अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीच्या लेकी राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या शालेय स्क्वॉश ॲण्ड रॅकेट विभागीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठाच्या मुलींनी उत्कृष्ट कामगिरी करुन जिल्ह्याच्या संघात स्थान पटकाविले आहे.
पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व स्क्वॉश ॲण्ड रॅकेट असोसिएशनच्या वतीने नुकतीच पुणे येथे ही स्पर्धा पार पडली. यामध्ये जिल्ह्यातून 300 पेक्षा जास्त महिला खेळाडू सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत ऐश्वर्या चौरसिया, समीक्षा पवार, अक्षदा बेलेकर, अपूर्वा आवारी या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांची पुणे येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघात निवड झाली आहे. जिल्ह्यात स्क्वॉश ॲण्ड रॅकेटचे मैदान नसतानाही मुलींनी हे यश मिळवले आहे.
या गुणवंत खेळाडूंचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंदजी माने, खजिनदार महेश घाडगे, प्राचार्य अरुण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, संतोष जाधव आदींसह विद्यालयाचे सर्व शिक्षकांनी या खेळाडूंचे अभिनंदन केले आहे. विजेत्या खेळाडूंना अहमदनगर जिल्हा स्क्वॉश ॲण्ड रॅकेटचे सचिव व क्रीडा शिक्षक घन:श्याम सानप यांचे मार्गदर्शन लाभले.