• Wed. Jun 24th, 2026

Mirrornews24

Marathi News

जिद्द, चिकाटी आणि कष्टानेच स्पर्धा परीक्षेत यश -पोलीस निरीक्षक उमेश परदेशी

ByMirror

Mar 16, 2026
सन फार्मा विद्यालयात आर.एस.पी. छात्र सैनिकांचा गौरव

सन फार्मा विद्यालयात आर.एस.पी. छात्र सैनिकांचा गौरव

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच मोठे ध्येय समोर ठेवून जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्याचा संकल्प करावा. मोबाईलचे तंत्रज्ञान केवळ ज्ञान संपादनासाठी वापरणे योग्य आहे; मात्र विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त वेळ अभ्यास, मैदानी खेळ आणि व्यायाम यासाठी देण्याचे आवाहन राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक उमेश परदेशी यांनी केले.


ग्रामीण विकास मंडळ संचलित सन फार्मा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नागापूर येथे महाराष्ट्र राज्य पोलीस गृह विभाग व शिक्षण विभागाच्या अंतर्गत आर.एस.पी. (छात्र सैनिक) पथकातील गुणवंत, शिस्तप्रिय व विविध क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष बबनराव कातोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात उमेश परदेशी बोलत होते.


परदेशी पुढे म्हणाले की, ज्या प्रकारे एखाद्या इमारतीचा पाया मजबूत असतो, तेव्हाच त्यावर अनेक मजले उभारता येतात; त्याचप्रमाणे शालेय जीवन हा विद्यार्थ्यांच्या भविष्यातील यशाचा भक्कम पाया आहे. या काळात घेतलेले शिक्षण, घडलेले संस्कार आणि केलेली मेहनत यामुळेच पुढे कोणत्याही क्षेत्रात मोठे पद गाठता येते. आज अनेक पोलीस अधिकारी शालेय जीवनापासून अभ्यास आणि परिश्रम करतच उच्च पदावर पोहोचले आहेत, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष बबनराव कातोरे यांनी संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी कार्यक्रमास पोलीस उपनिरीक्षक विजय भोसले, ड्रिल इन्स्पेक्टर व सहाय्यक फौजदार नितीन मोरे, आबासाहेब घिगे, मंगेश दाभाडे तसेच संस्थेचे उपाध्यक्ष शांताराम गाडे, संचालक रावसाहेब सप्रे, सुदाम भोर, प्राचार्य रावसाहेब सातपुते आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.


वाहतूक रस्ता सुरक्षा अभियानाच्या अनुषंगाने शासनाच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात आर.एस.पी. पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून विविध जनजागृती उपक्रम राबवले जातात. रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे, ट्राफिक सिग्नलवर वाहतुकीचे नियमन, यात्रा काळात पार्किंग व वाहतूक व्यवस्थापन, रस्त्यावरील सूचना फलकांचे प्रात्यक्षिक, वाहनधारकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगणे तसेच नियम तोडल्यास होणाऱ्या दंडाबाबत जागरूकता निर्माण करणे असे उपक्रम विद्यार्थ्यांकडून राबवले जात आहेत.


हे सर्व उपक्रम आर.एस.पी. अधिकारी व समादेशक राज धस यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडत आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत पोलीस मुख्यालयाच्या वतीने उमेश परदेशी यांच्या हस्ते त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच पोलीस मुख्यालयात झालेल्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये विद्यालयातील आर.एस.पी.च्या 72 विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांचेही प्रशस्तीपत्र देऊन कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य रावसाहेब सातपुते यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव बारस्कर यांनी केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *