शहरातील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचा उपक्रम
स्वदेशीचा संदेश देत फटाकेमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. पण या सणात चायनीज वस्तूंच्या वाढत्या वापरामुळे आपल्या परंपरेला आणि पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्लास्टिक व फटाकेमुक्त मुक्त दिवाळी, स्वदेशी वस्तूंची दिवाळी! हा नारा देत स्वतःच्या हातांनी आकर्षक, रंगीबेरंगी आणि पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार करून स्वत: तयार केलेले आकाश कंदील दिवाळीत वापरण्याचा संकल्प केला.
शाळेच्या कार्यअनुभव कार्यशाळेअंतर्गत जीवन कौशल्याचा भाग म्हणून आकाश कंदील बनवा, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी उत्साहात सहभाग घेतला. टाकाऊ वस्तू, रंगीत क्राफ्ट पेपर, दोरे, गोंद आणि कागदांचा वापर करून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या आकाराचे आणि आकर्षक डिझाईन्सचे आकाश कंदील तयार केले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कला, कल्पकता आणि सर्जनशीलतेला वाव मिळाला, तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी चायनीज आकाश कंदील नको, आपल्याच हातांनी बनवलेले स्वदेशी कंदील हवे, असा निर्धार करून स्वदेशी उत्पादनांचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.
या कार्यशाळेला मुख्याध्यापिका लक्ष्मी आहेर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळावा आणि त्यांनी बनवलेल्या वस्तूंपासून दिवाळी साजरी करण्याचा आनंद मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. प्लास्टिकमुक्त दिवाळीच्या दिशेने हे एक छोटे पण महत्त्वाचे पाऊल आहे. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ कागदी कंदील तयार केले नाहीत, तर स्वदेशीचा गौरव आणि पर्यावरणाची काळजी हा संदेश दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
माध्यमिक शाळेच्या प्राचार्या छाया काकडे यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, दिवाळीचा खरा अर्थ फक्त दिवे लावणे नाही, तर मनातला अंधार घालवणे आणि पर्यावरणास अनुकूल असा बदल घडवणे हाच आहे. विद्यार्थ्यांचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन विभागप्रमुख सुजाता दोमल यांनी केले होते. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उर्मिला साळुंखे, मीनाक्षी खोडदे, शितल रोहोकले, जयश्री खांदोडे, भारती सुसरे, शितल मदने, सोनाली अनभुले, भाग्यश्री लोंढे, रूपाली जाधव, पुनम घाडगे, इंदुमती दरेकर, रूपाली पांडुळे आदी शिक्षिका उपस्थित होत्या.