27 महाविद्यालयांचे 162 खेळाडू सहभागी; विजेत्यांतून निवडणार आंतरविभागीय संघ
क्रीडा हेच व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन -जयंत वाघ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, अहिल्यानगर जिल्हा क्रीडा विभाग आणि न्यू आर्ट्स, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन (मुले) स्पर्धा वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 27 महाविद्यालयांच्या 162 विद्यार्थी खेळाडू सहभागी झाले होते. जिल्ह्यातील प्रतिभावान खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संधी मिळावी या उद्देशाने ही निवड स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे सादरीकरण केले. एकेरी व दुहेरी प्रकारात या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतूनच पुढे जाणारा मुलांचा आंतरविभागीय बॅडमिंटन संघ निवडला जाणार असल्याने स्पर्धेत चुरस पाहायला मिळाली.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे विश्वस्त जयंत वाघ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब सागडे, महाविद्यालयाचे प्रबंधक बबन साबळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जयंत वाघ म्हणाले म्हणाले की, क्रीडा हेच व्यक्तिमत्त्व विकासाचे साधन आहे. विद्यार्थ्यांमध्ये असलेली स्पर्धात्मकता हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. आजच्या डिजिटल युगात शरीरसौष्ठव, शिस्त आणि टीमवर्क शिकविण्याचे माध्यम म्हणजे मैदानी क्रीडा प्रकार आहे. बॅडमिंटनसारखे खेळ विद्यार्थ्यांना एकाग्रता, वेग आणि निर्णयक्षमता वाढविण्यास मदत करतात. या स्पर्धेतून खेळाडूंना संधी मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले की, जिल्ह्यातील क्रीडा संस्कृती अधिक मजबूत करण्यासाठी विविध स्पर्धेतून खेळाडूंना चालना दिली जात आहे. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आत्मविश्वास मिळतो आणि राज्यस्तरावर त्यांची तयारी होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याचबरोबर डॉ. सतीश चोरमले, विक्रम सातपुते, सुनील जाधव, प्रा. संजय धोपावकर, डॉ. रवींद्र खंदारे, डॉ. विजय म्हस्के, डॉ. रवींद्र काळाणे, सॅविओ वेगास आदी ज्येष्ठ प्राध्यापक व संघ व्यवस्थापकही उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद मगर, धन्यकुमार हराळ, तुषार चौरे, तसेच जिमखाना विभागातील स्वयंसेवक व खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.