• Thu. Jan 1st, 2026

केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीच्या उन्हाळी शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

May 14, 2025

समर कॅम्पमुळे मुलांचा शारीरिक व बौद्धिक विकास होतो -मा. नगसेवक संभाजी पवार


विद्यार्थ्यांना संस्कार, शिक्षण, हस्तकला, चित्रकला, सर्जनशीलता, भाषण, वक्तृत्व कलेचे धडे

नगर (प्रतिनिधी)- केडगाव स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेच्या वतीने सात दिवसीय उन्हाळी शिबिर उत्साहात साजरे झाले. केडगावसह संपूर्ण शहरातून या शिबिरात विद्यार्थी सहभागी झाले होते. शिक्षकांनी विशेष परिश्रम घेऊन शिबिरात संस्कार, शिक्षण, हस्तकला, चित्रकला, सर्जनशीलता, भाषण, वक्तृत्व कलेचे विद्यार्थ्यांना धडे दिले.


एक विद्यार्थी खास छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून येऊन या शिबिरात सहभागी झाला होता. छबुराव कोतकर यांच्या संकल्पनेतून तर स्वाती बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांच्या शारीरिक दृष्टीने बास्केटबॉल, क्रिकेट, खो-खो, ट्रेकिंग सारखे खेळ घेण्यात आले.


यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नगरसेवक संभाजी पवार म्हणाले की, केडगाव स्पोर्ट्स अकॅडमीने उन्हाळी शिबिरात मुलांना मोबाईल व टीव्हीपासून दूर ठेवले. त्यांच्या शारीरिक व बौद्धिक विकास करून घेतला. आज संस्कारक्षम पिढी घडविण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांनी घेतलेल्या परिश्रमाचे व या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.


कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. सचिन आहेर म्हणाले की, मुलांचा शिक्षणाबरोबरच शारीरिक विकास होणे गरजेचे असून, अशा उपक्रमातून मुलांना चालना व व्यासपीठ मिळत असल्याचे सांगितले. यावेळी मुख्याध्यापक संदीप भोर, डॉ. देवेशकुमार बारहाते, डॉ. बलराज पाटील, संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब कोतकर, छबुराव कोतकर, स्वाती बारहाते, पवन कोतकर, प्रा. प्रसाद जमदाडे, गुलाब कोतकर, आप्पा मतकर आदी मान्यवर तसेच विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उन्हाळी शिबिरसाठी केडगावच्या ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने मुलांना आकर्षक बक्षीसं देण्यात आले. स्वाती बारहाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. छबुराव कोतकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *