ज्ञान, संस्कार आणि आत्मविकासाचा दीप उजळवणारा प्रेरणादायी सोहळा रंगला
ज्ञान हेच आत्म्याचे खरे आभूषण -प. पू. प्रविणऋषिजी म. सा.
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजातील नवतरुण पिढीमध्ये संस्कार, धर्मज्ञान आणि आत्मविकासाची जाणीव रुजविण्याच्या उद्देशाने टीम उडान तर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारी सुवीर 2.0 पुच्छिसुणं स्पर्धा यंदा अत्यंत भव्यदिव्य वातावरणात पार पडली. पुणे येथील श्री संघ सांस्कृतिक भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच प. पू. प्रविणऋषिजी म. सा. यांच्या पावन सान्निध्यात आनंद, उत्साह आणि आध्यात्मिकतेच्या वातावरणात संपन्न झाला.
या स्पर्धेची मुख्य परीक्षा दोन गटांत विभागली गेली होती. पहिला गट 8 ते 13 वर्षांचा आणि दुसरा गट 14 ते 25 वर्षांचा होता. विशेष म्हणजे अवघ्या 5 वर्षांच्या लहान मुलांनीही या धार्मिक स्पर्धेत सहभाग नोंदवत सर्वांना थक्क केले. अल्पवयातच त्यांनी 29 गाथा कंठस्थ सांगून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या 29 गाथांमधून भगवान महावीरांच्या जीवनाचा आणि उपदेशांचा अत्यंत सुंदर व अर्थपूर्ण संदर्भ दिला जातो. महावीर स्तुतीचे मंगलगान मोठ्या श्रद्धेने करण्यात आले. या स्पर्धेमागील हेतू म्हणजे भावी पिढीत धर्मभावना, संस्कार व ज्ञानाची बीजे रोवणे हा असून टीम उडान ही परंपरा दरवर्षी जपते. यंदाच्या सुवीर 2.0 स्पर्धेला भारतातील विविध राज्यांप्रमाणेच परदेशातूनही मुला-मुलींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दोन वर्षांपासून वीस वर्षांपर्यंतच्या स्पर्धकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. एकूण सुमारे 1500 पेक्षा अधिक बाल-तरुण स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले, तर नगर जिल्ह्यातून तब्बल शंभरपेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. नगर जिल्ह्यातील केंद्र आनंदधाम होते, अशी माहिती टीम उडानच्या वतीने अल्पना कासवा यांनी दिली. या स्पर्धेसाठी अहिल्यानगर येथून अस्मिता गांधी, रूपाली चंगेडिया, आरती पितळे, ममता कटारिया, पूनम भंडारी आणि कल्पना मुथा यांनी सक्रियपणे जबाबदाऱ्या पार पाडल्या.
कार्यक्रमादरम्यान विजेत्यांना पुणे समाजातील गणमान्य व्यक्ती अनिल नहार सुरेश गांधी कन्हैयालाल पारक मधुबाला कटारिया रवींद्र सांकला लतिका सांकला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पहिल्या गटात प्रथम पुरस्कार: सायकल, द्वितीय पुरस्कार: स्मार्ट वॉच, तृतीय पुरस्कार: स्टडी टेबल, तर दुसऱ्या गटात प्रथम पुरस्कार: किंडल ई-रीडर, द्वितीय पुरस्कार: फोनिक ग्लासेस, तृतीय पुरस्कार: नाईट लॅम्प विजेत्यांना प्रदान करण्यात आले. याशिवाय, ज्यांनी सर्व 29 गाथा कंठस्थ केल्या त्या 29 विद्यार्थ्यांना विशेष प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले.
आशीर्वचन देताना प. पू. प्रविणऋषिजी म. सा. म्हणाले की, ज्ञान हेच आत्म्याचे खरे आभूषण आहे. अशा प्रकारच्या स्पर्धा युवकांमध्ये धर्म, अनुशासन आणि आत्मविकासाची भावना प्रखर करतात. धर्माचा अभ्यास म्हणजे आत्म्याशी संवाद साधण्याची प्रक्रिया आहे, आणि या स्पर्धेमुळे युवकांना चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच महासती आदर्श ज्योतीजी महाराज आणि महासती श्री सुनंदाजी महाराज यांनी सर्व विजेत्यांचे कौतुक करुन टीम उडानला भविष्यातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. जामखेड येथील बालस्पर्धकांनी धार्मिक नाटक आणि वाद्य प्रस्तुतीद्वारे आपली कला सादर केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सुसंगठित आयोजन टीम उडानच्या सदस्यांनी केले. समाजातील वरिष्ठ नागरिकांनी समितीचे अभिनंदन करत, तरुणांनी धर्म, संस्कार आणि मूल्यनिष्ठ जीवनाच्या दिशेने प्रेरित व्हावे असे आवाहन केले. पुरस्कार वितरणाने कार्यक्रमाचा समारोप झाला.
