सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या ग्रुपच्या महिलांचा सन्मान
मुलींचे शिक्षण व महिलांच्या आरोग्यासाठी सेवाप्रीतचा पुढाकार; विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प
नगर (प्रतिनिधी)- गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी कार्यरत असलेल्या व वंचित घटकांना आधार देणाऱ्या सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनचा स्नेह मेळावा शहरात उत्साहात पार पडला. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेऊन यापुढे मुलींच्या शिक्षणासाठी व महिलांच्या आरोग्यावर विशेष उपक्रम घेण्याचा संकल्प महिला पदाधिकाऱ्यांनी केला. उत्कृष्ट सामाजिक प्रकल्प राबविणाऱ्या ग्रुपच्या महिला लिडर व सदस्यांना सन्मानित करण्यात आले.
ग्रुपच्या ज्येष्ठ सदस्या तथा मार्गदर्शिका सुशिला मोडक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने स्नेह मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी सेवाप्रीतच्या संस्थापक अध्यक्षा जागृती ओबेरॉय, अर्चना खंडेलवाल, सविता चड्डा, डॉ. सिमरन वधवा, स्विटी पंजाबी, अन्नू थापर, रितू वधवा, गितांजली माळवदे, गीता नय्यर, निशा धुप्पड आदींसह महिला सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सर्व महिलांच्या एकत्रित सामाजिक योगदानाने सेवाप्रीत चालत आहे. प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचे रूप असून त्या परमेश्वराची सेवा सेवाप्रीत करत आहे. दिवा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो, त्याचप्रमाणे सेवाप्रीतच्या सदस्या स्वतःच्या प्रकाशाने इतरांच्या जीवनातील अंधकार दूर करण्याचा प्रयत्न करत आहे. चांगले कर्म करण्याची ईश्वराने जणू एक संधी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षणासाठी प्रोत्साहन देऊन मुला-मुलींचे भविष्य सुधारून समाज घडविण्याचे कार्य सेवाप्रीतच्या महिला तन-मन धनाने करत असून, मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न बिकट होत असताना त्यांच्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सुशिला मोडक म्हणाल्या की, समाजाप्रती ममताभाव दाखवून सेवाप्रीतच्या महिला सामाजिक संवेदना जपत आहे. त्याग व समर्पण भावनेने सामाजिक प्रश्न सोडविण्याच्या कार्यासाठी महिलांनी घेतलेला पुढाकार सामाजिक बदलाचे पाऊल आहे. भावी पिढीत देखील सामाजिक संवेदना जागरुक करुन हे कार्य पुढे घेऊन जावे लागणार असल्याचे त्या म्हणाल्या.
सेवाप्रीतच्या स्नेह मेळाव्यात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळ रंगले होते. विजेत्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानिया मुलतानी यांनी केले. आभार डॉ. सिमरन वधना यांनी मानले.
–—
जिनियस फाऊंडेशन ॲण्ड वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून सेवाप्रीतच्या निस्वार्थ कार्याची दखल
सेवाप्रीत सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून महिला मागील 10 वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवित आहे. त्यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल घेऊन जिनियस फाऊंडेशन ॲण्ड वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाकडून सन्मान जाहीर करण्यात आला आहे. सेवाप्रीतचे सामाजिक कार्य जागतिक पातळीवर पोहचले असून, जिनियस फाऊंडेशनच्या वर्ल्ड बुकमध्ये त्याची नोंद करण्यात आली आहे.